करमाळ्यात शह-काटशहाचा डाव रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:16 AM2021-07-01T04:16:23+5:302021-07-01T04:16:23+5:30
करमाळा : जगताप व बागल गटाने प्रतिष्ठेच्या केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रभारी सचिव निवडीच्या बैठकीस बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष ...
करमाळा : जगताप व बागल गटाने प्रतिष्ठेच्या केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रभारी सचिव निवडीच्या बैठकीस बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. सावंत गटाने बागलांच्या पारड्यात माप टाकल्याने राजकारणाची समीकरणे बदलू लागली आहेत. यानिमित्ताने शह-काटशहाचा डाव रंगला आहे.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर झाल्यापासून गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत बाजार समिती तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरू लागली आहे. माजी आमदार नारायण पाटील गटाचे समर्थक व बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर यांनी जगताप गटातून बंड केल्यापासून तालुक्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या आहेत.
सोमवारी प्रभारी सचिव निवडीच्या बैठकीत बाजार समितीचे प्रभारी सचिव पाटणे की क्षीरसागर यावरून शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या निरीक्षणाखाली हात वर करून मतदान घेण्यात आले. बाजार समितीमध्ये काटावर बहुमत असल्याने सर्वांचे लक्ष लागलेल्या या घडामोडीत बागल गटाचे संचालक व बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी नसती कटकट नको म्हणून ते बैठकीस आलेच नाहीत. याविषयी तालुकाभर उलटसुलट चर्चा रंगली आहे.
----
राजकारण ढवळले
सभापतीला असलेल्या जादा एक मताच्या विशेषाधिकाराने राजेंद्र पाटणे यांच्या नावाचा प्रभारी सचिव म्हणून ठराव झाला असला तरी बाजार समितीचे राजकारण मात्र ढवळून निघाले आहे. जगताप गटाबरोबर असलेले सावंत गटाचे वालचंद रोडगे हे हमालांचे प्रतिनिधी बागलांच्या कळपात गेले तर माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक दत्तात्रय रणसिंग यांनी जगतापांना साथ दिली आहे.
---
बाजार समितीमध्ये राजकारण नको, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याच्या मताचा मी आहे. आपण पक्षाच्या कामानिमित्ताने मुंबईला गेलो होतो. त्यामुळे मला या बैठकीस येता आले नाही.
- संतोष वारे, संचालक व तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.
----
राजेंद्र पाटणे या बाजार समितीच्या कर्मचाऱ्यावर बढतीमध्ये सातत्याने अन्याय झाला होता. त्यांना या निमित्ताने न्याय देण्यासाठी सावंत गटाने पाटणेंच्या बाजूने मतदान केले. राजकारणात आम्ही आ. संजयमामा शिंदे गटाबरोबरच सक्रिय आहोत.
- सुनील सावंत, नेते सावंत गट
----
हमालांच्या हितासाठी सभापती बंडगर यांच्या विनंतीनुसार पाटणे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कुठलेही राजकारण नाही. - अॅड. राहुल सावंत, अध्यक्ष, हमाल पंचायत.
----