सोलापुरात शक्तीदेवीचा आजपासून जागर; दुपारी १.३६ पर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:52 AM2018-10-10T11:52:10+5:302018-10-10T11:55:18+5:30
सोलापूर : शक्तीदेवीच्या नवरात्र महोत्सवास आज बुधवार, दि. १० आॅक्टोबरपासून प्रारंभ होत असून, शक्तीदेवीचा जागर करण्यासाठी सोलापूरकर भाविकांची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील ४०६ सार्वजनिक नवरात्र मंडळांच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, २२१ मंडळे स्वतंत्र मिरवणुका काढणार आहेत. दरम्यान, घटस्थापनेसाठी पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी १.३६ वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
सोलापूरची आराध्य देवता रूपाभवानी मातेच्या मंदिरात घटस्थापनेची तयारी पूर्ण झाली असून, सकाळी ८ वाजता पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. पूर्व भागातील महालक्ष्मी मंदिरात सकाळी सात वाजता घटस्थापना होणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय हिंगुलांबिका, कालिका, शाकंभरी देवीच्या मंदिरातही सकाळी लवकर घटस्थापना होणार आहे. रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सव काळात दररोज पहाटेपासून भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांच्या सुविधेसाठी ट्रस्ट आणि भक्तमंडळाने तयारी केली आहे.
नवरात्रानिमित्त घरोघरी घटांची स्थापना केली जाते. घटाच्या साहित्याच्या खरेदीसाठी लक्ष्मी मंडई, हद्दवाढ भागातील आसरा, विजापूर रोड परिसरात मोठी गर्दी होती. दरम्यान, पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे घटस्थापनेपासून दसºयापर्यंत ९ दिवस किंवा १० दिवसांचे अंतर असते. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक असतो. या वर्षी घटस्थापनेपासून ९ व्या दिवशी दसरा आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झालेले आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा कितव्याही दिवशी आला तरी शुभच असतो, असेही ते म्हणाले.
-
दसºयाचा विजय मुहूर्त
विजयादशमी अर्थात दसरा सण १८ आॅक्टोबर रोजी असून, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त दुपारी २.२० ते ३.०७ या दरम्यान आहे. तत्पूर्वी अशौचामुळे ज्यांना १० आॅक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच निवृत्तीनंतर (अशौच संपल्यावर) ११ आॅक्टोबर, १३ आॅक्टोबर, १६ आॅक्टोबर, १७ आॅक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व १८ रोजी नवरात्रोत्थापन करावे, असे आवाहन दाते यांनी केले.