शक्कल लढवली... महागातही पडली; फळे विकण्याच्या नावाखाली दारूची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 01:24 PM2021-04-26T13:24:40+5:302021-04-26T13:24:46+5:30
लॉकडाऊनमध्ये खुलेआम दारूविक्री :
सोलापूर : लॉकडाऊनमध्ये सकाळी ७ ते ११ पर्यंत केवळ अन् केवळ भाजीपाला अन् किराणा माल खरेदीसाठी मुभा आहे. ही संधी साधून एकाने देशी-विदेशी दारूविक्रीची शक्कल लढवली. फळे विकण्याच्या नावाखाली कॅरेटमध्ये दारू विकताना विजापूर नाका पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलेच. श्रीनिवास तिमण्णा कोरे (वय-४०, रा. कल्याण नगर, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
कल्याणनगर येथे सार्वजनिक रस्त्याच्या कडेला फळांच्या कॅरेटमध्ये देशी-विदेशी दारू ठेवून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती विजापूर नाका पोलिसांना कळवली होती. २२ एप्रिल रोजी पेट्रोलिंग करत असलेले पथक कल्याण नगर भाग-२ येथील सार्वजनिक रस्त्यावर पोहोचले. तेव्हा श्रीनिवास कोरे हा फळेविक्री करण्यासाठी असलेला कॅरेट घेऊन बसला होता. पोलिसांनी जवळ जाऊन पाहणी केली असता, त्यामध्ये देशी-विदेशी दारू असलेल्या ६० हजार ६६ रुपये किमतीच्या बाटल्या असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्याजवळील दारूचा साठा जप्त केला. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल तोळनुरे, पोलीस कॉन्स्टेबल भीमदे, अनिल गवसाने, इम्रान जमादार यांनी पार पाडली.
वाईन शॉप बंद असल्याची संधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे सध्या शहरांमध्ये परमिटरूम-बीयर बार व वाईन शॉप बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या शहरातील काही भागांमध्ये अशा पद्धतीने शक्कल लढवून देशी-विदेशी दारूविक्री होत असल्याचा प्रकार आढळून येत आहे.