​​​​​​​शोभेच्या दारुकामाने सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेची सांगता, आकाशात सप्तरंगी आतषबाजी, स्मार्ट सिटीचा दिला संदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 01:02 PM2018-01-16T13:02:59+5:302018-01-16T13:06:01+5:30

आकाशात बुलंद आवाजात सप्तरंगांची चमचमती पखरण करणारे आऊटगोळे, निसर्गाच्या वैविध्यपूर्ण रंगांचे पाट, जमिनीवर सोडणारे धबधबे, मौत का कुआँ, जमिनीवर जणू चांदण्याच पसरविणारे चक्र, अशा अतिशय नयनरम्य सादरीकरणाने सिद्धेश्वर यात्रेतील शोभेचे दारूकाम आनंददायी आणि मनोरंजक ठरले.

Shambhimar Darukam from Siddheshwar Yatra of Solapur, Saptarangi fireworks in the sky, Message given by Smart City | ​​​​​​​शोभेच्या दारुकामाने सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेची सांगता, आकाशात सप्तरंगी आतषबाजी, स्मार्ट सिटीचा दिला संदेश 

​​​​​​​शोभेच्या दारुकामाने सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेची सांगता, आकाशात सप्तरंगी आतषबाजी, स्मार्ट सिटीचा दिला संदेश 

googlenewsNext
ठळक मुद्दे एम. ए. पटेल यांचे सादरीकरण प्रत्येकाच्याच मनात देशाभिमान दृढ करणारे ठरलेकोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथील शिकलगार फायर वर्क्सने सप्तरंगी उधळणाचा प्रारंभसातारा जिल्ह्यातील सुर्ली (ता. कराड) येथील आदित्य फायर वर्क्सच्या सादरीकरणाला सोलापूरकरांनी दाद दिली


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ : आकाशात बुलंद आवाजात सप्तरंगांची चमचमती पखरण करणारे आऊटगोळे, निसर्गाच्या वैविध्यपूर्ण रंगांचे पाट, जमिनीवर सोडणारे धबधबे, मौत का कुआँ, जमिनीवर जणू चांदण्याच पसरविणारे चक्र, अशा अतिशय नयनरम्य सादरीकरणाने सिद्धेश्वर यात्रेतील शोभेचे दारूकाम आनंददायी आणि मनोरंजक ठरले. स्मार्ट सोलापूरचा संदेश आणि ‘चीन हो या पाक है भारत तैय्यार’ हे एम. ए. पटेल यांचे सादरीकरण प्रत्येकाच्याच मनात देशाभिमान दृढ करणारे ठरले.
होम मैदानावर उत्तरेकडील पटांगणात रात्री साडेआठच्या सुमारास शोभेच्या दारुकामाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी पाच वाजता नंदीध्वजांची मिरवणूक बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यापासून निघाली. सायंकाळचा काळ असल्यामुळे विद्युत रोषणाईने सजविलेले नंदीध्वज अतिशय डौलदार दिसत होते. मिरवणूक पाहण्यासाठी मार्गाच्या दुतर्फा गर्दी झाली होती. हिरेहब्बू वाड्यापासून निघालेली मिरवणूक दाते गणपती मंदिर परिसर, राजवाडे चौक, दत्त चौक, सोन्या मारुती, जुनी फौजदार चावडी, माणिक चौक, पंचकट्टामार्गे होम मैदानावर आली. त्यानंतर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते शोभेच्या दारूकामाचे औपचारिक उद्घाटन झाले. जिल्हा मुख्य न्यायाधीश श्रीकांत अणेकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, देवस्थान पंचसमितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आणि अन्य सदस्य उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथील शिकलगार फायर वर्क्सने सप्तरंगी उधळणाचा प्रारंभ केला. त्यांनी उडविलेल्या स्काय बॉल आऊटगोळ्यांनी परिसर दणादणून सोडला. फॅन्सी कलर आऊटगोळे आकाशात जात असताना दर्शक सिद्धरामेश्वरांचा जयजयकार करत होते. त्यांनी सादर केलेल्या एकवीस फुटी नागाला दाद मिळाली. म्हैसूर कारंजा, नर्गिस झाड, कमान चक्र आणि स्टार चक्राने प्रत्येकालाच प्रसन्न केले. मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील सागर फायर वर्क्सचे सादरीकरणही उत्तम होते. तारामंडळाने सुरुवात केल्यानंतर सिद्धेश्वर मंदिराचा सुंदर देखावा सादर केला. दर्शकांनी मनमुराद दाद दिली. महाद्वार, नर्गिस, स्टार व्हील, राजदरबारी आदी ११ प्रकारचे सादरीकरण सागर फायर वर्क्सने केले. बीड जिल्ह्यातील दौसाळा येथील जय महाराष्टÑ फायर वर्क्सने कलर तोफा हवेत उडवून धमाल केली. धबधबा, ओम, म्हैसूर कारंजा ही सादरीकरणं दर्शकांना अतिशय भावली.
सोलापूरच्या एम. ए. पटेल यांच्या सादरीकरणाकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यांनी सर्वाधिक २३ आयटम्स सादर केले. आॅलिम्पिक तारामंडळाच्या चाळीस प्रकारांचे सादरीकरण करून दारुकामाच्या माध्यमातून सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेस हार घातला. नायगारा फॉल्स आणि भारताचा नकाशा दाद घेऊन गेले. सर्वात लक्षवेधी ठरले ते ‘चीन हो या पाक है भारत तैय्यार’. चीन आणि पाकिस्तानने कितीही ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला, क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन केले तरी भारत सज्ज आहे, असा संदेश त्यांनी या सादरीकरणातून दिला. यावेळी सर्वत्र भारतमातेचा जयजयकार झाला. सिद्धरामेश्वराची कृपा असल्यावर सोलापूरकरांना घाबरायचे कारण नाही, असा संदेश असणारे ‘न चिंता न भय सिद्धेश्वर महाराज की जय’ सादरीकरण दाद घेऊन गेले. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश झाल्यामुळे सध्या सर्वत्र ‘स्मार्ट सोलापूरचा’ बोलबाला आहे. या पार्श्वभूमीवर पटेल यांनी ‘स्वच्छ सोलापूर, स्मार्ट सोलापूर’ हे सादरीकरण केले. 
सातारा जिल्ह्यातील सुर्ली (ता. कराड) येथील आदित्य फायर वर्क्सच्या सादरीकरणाला सोलापूरकरांनी दाद दिली. 
--------------------
एम. ए. पटेल ठरले अव्वल
- सिद्धेश्वर देवस्थान पंचसमितीने या निमित्ताने घेतलेल्या शोभेच्या दारुकामाच्या स्पर्धेत यंदाही एम. ए. पटेल यांनीच बाजी मारली. त्यांनी सर्वाधिक प्रकार सादर केलेच. शिवाय ते प्रबोधनात्मक आणि आशयपूर्ण होते. 

Web Title: Shambhimar Darukam from Siddheshwar Yatra of Solapur, Saptarangi fireworks in the sky, Message given by Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.