गोजिरवाण्या घरात लाजिरवाण्या मालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 07:47 AM2019-10-24T07:47:56+5:302019-10-24T07:48:01+5:30
स्वत:ही आणि आपल्या पाल्यांना टीव्हीचं हे व्यसन लागू देऊ नका, वेळीच आवरा हेच तुमच्या आमच्या भल्याचं आहे.
एक जाहिरात, ‘डिस्ने किड्स पॅक’ची़ ७-८ वर्षांची मुलगी. आई तिला तिच्या मैत्रिणीबद्दल विचारते तर छोटी मोठ्या अविर्भावात म्हणते, ‘क्या समझ रख्खा है उसने मुझे ? मेरे खिलाफ षड्यंत्र रच रही है । मै उसका बदला जरुर लँुगी । वो मेरे पंजेसे बच नही सकती ।’ ही तिची वाक्ये, बोलण्याची ढब पाहून आई थक्क होते. त्यावर भाष्य येते, ‘बडों की सीरियल बच्चे देखेंगे तो क्या सिखेंगे ।’ यात सास-बहु टाईपच्या सीरियलचा दुष्परिणाम नेमकेपणाने दाखविलेला.
आज टी. व्ही. सीरियल लोकांच्या जगण्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. पण बहुसंख्य मालिका परिवाराने एकत्रित बसून बघाव्या अशा असतात, असे फारसे कोणी म्हणणार नाही. केवळ टी. आर. पी. वाढविण्याच्या मागे असलेल्या अशा मालिकांचे सुरुवातीचे कथानक, विषय नंतर कधी, कसे अचानक वळण घेईल, याचा पत्ता लागत नाही. त्यातील पात्रांचे वर्तन, वेशभूषा आणि वय अचानक आमूलाग्र बदललेले केव्हा दिसेल हेही सांगता येत नाही.
विवाहबाह्य संबंध, पारिवारिक षड्यंत्र यासारख्या मसाल्यांनी या मालिका ठासून भरलेल्या असतात. शह-काटशह यांच्यात परिवारातील सदस्य गुंतलेले दिसतात. उपजीविकेसाठी काम करत असलेले फारसे कधी त्यांना दाखवत नाहीत. पैसा, स्वार्थ यांच्यापुढे नातेसंबंध, किमान नैतिक मूल्ये यांचे महत्त्व त्यांच्या लेखी नसते. स्त्रीत्व, तिचा सन्मान यांचा पुरेपूर अवमान पुरुषांबरोबर स्त्री पात्रेही करताना दाखविली जातात. बहुसंख्य हिंदी मालिका तर वास्तवापासून कोसो दूरच असतात. अतिश्रीमंत परिवार, त्यात नखशिखांत दागदागिने, विचित्र पेहराव असलेली स्त्री पात्रे. हे अवास्तव चित्रण. पण प्रेक्षकही ते चवीने पाहतात म्हणून ‘मागणी तसा पुरवठा’ या न्यायाने अशा मालिकांची निर्मिती होत राहते.
ऐतिहासिक विषयांच्या मालिकांमध्ये तर कधी रंजकता वाढवण्यासाठी तर कधी सामाजिक घटकांना खूष करण्यासाठी नको त्या ऐतिहासिक पात्रांचे उदात्तीकरण केलेले दिसते. तर कधी चांगली चांगली चरित्रे थोडक्यात आटोपती घेतलेली दिसतात. ज्यांचा इतिहासाचा फारसा अभ्यास नाही असे प्रेक्षक मग सीरियलमधील इतिहासच खरा मानू लागतात. त्यामुळे अशी ऐतिहासिक तथ्ये गैरसमजाच्या भोवºयात सापडतात. बहुसंख्य प्रेक्षक वर्ग महिला व मुले असल्याने अशा अतिरंजित मालिकांमुळे त्यांच्या भावनिक, वैचारिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होतो. याला अपवाद असलेली एखादी मालिका अधूनमधून क्वचितच दिसते.
पुरुष मंडळींच्या आवडत्या असणाºया वृत्तवाहिन्यांवरील चर्चा-महाचर्चा, त्यांचे विषय, त्यात आमंत्रित नेते, अभ्यासक, प्रतिनिधी हा संशोधनाचा विषय आहे. कित्येकदा आपण चर्चा पाहतोय, की भांडण असा प्रश्न पडतो.
डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफीसारख्या वाहिन्या ज्ञानवर्धनाचे काम करताना दिसतात. पण त्यांचा प्रेक्षक वर्ग कमी. मुलांसाठी असलेल्या कार्टुन वाहिन्या पाहण्याचे व्यसन मुलांना लागू नये याची काळजी घेणेही गरजेचे आहे. शेवटी टी. व्ही. चा योग्य रितीने योग्य प्रमाणात वापर झाला तर ते मनोरंजनाचे, ज्ञानवर्धनाचे साधन बनू शकते, नाही तर ते व्यसन बनते. सास-बहू टाईपच्या मालिका पाहून तर वाटते की गोजिरवाण्या घरात अशा लाजिरवाण्या टी. व्ही. मालिका नकोच. असं प्रामाणिकपणे वाटते. सांगण्याचं तात्पर्य असं की, वाहिन्यांवर काय दाखवावं हा ज्याचा त्यांचा प्रश्न असला तरी त्या पाहयच्या की नाही हे तर आपल्या हातात आहे ना! म्हणून प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते, स्वत:ही आणि आपल्या पाल्यांना टीव्हीचं हे व्यसन लागू देऊ नका, वेळीच आवरा हेच तुमच्या आमच्या भल्याचं आहे असं आवर्जून नमूद करावेसे वाटते.
- डॉ. छाया कुलकर्णी,
(लेखिका झेडपी शाळेत शिक्षिका आहेत.)