सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार ?
By appasaheb.patil | Published: June 15, 2019 03:14 PM2019-06-15T15:14:10+5:302019-06-15T15:23:05+5:30
उद्या मंत्रीमंडळाचा विस्तार; आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या चेहºयांना मिळणार संधी
सोलापूर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या रविवार १६ जून रोजी होणार हे नक्की झाले असून, सकाळी ११ वाजता नवे मंत्री शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार तानाजीराव सावंत याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
तानाजी सावंत हे यवतमाळ वाशीममधून विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांचा परंडा येथे साखर कारखाना आहे. सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील रहिवासी आहेत. सध्या सावंत हे सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. उद्या होणा-या मंत्रिमंडळ विस्तारामुळे मंत्रालयात त्यासंबंधींची तयारी सुरू करण्यात आली आहे. या तयारीमुळे इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दुसरीकडे सर्वसामान्य जनतेलाही या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल उत्सुकता आहे.
राज्यात लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विस्तार होत असून, त्यात अनेक नव्या चेह-यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अलिकडेच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह काही राधाकृष्ण विखे पाटील यांचीही मंत्रिपदी वर्णी लागू शकते, असे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून समजत आहे. याशिवाय आशिष शेलार, औरंगाबादचे आमदार अतुल सावे, राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, जयदत्त क्षीरसागर, संजय कुटे, डॉक्टर अनिल बोंडे यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्यास भाजपा उत्सुक असून त्याबद्दलचे चित्र उद्याच स्पष्ट होणार आहे. रिपाइं (आठवले गट) तर्फे अविनाश महातेकर यांचा समावेश होणार असून, केंद्रीय राज्यमंत्री व रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांचे नाव पाठविल्याचे समजत आहे.