‘स्मार्ट’ सोलापूरसाठी प्रयत्नशील शरद बनसोडे
By admin | Published: May 30, 2014 12:51 AM2014-05-30T00:51:30+5:302014-05-30T00:51:30+5:30
उद्योजक, व्यापार्यांच्या बैठकीत विमानसेवा सुरू करण्याचा मानसं
सोलापूर : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशभरातील शंभर शहरे स्मार्ट शहरे म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला असून, या स्मार्ट शहरांमध्ये सोलापूरचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी आज दिले. उद्योजक आणि व्यापार्यांनी सहकार्य केल्यास विमानसेवा महिनाभरात सुरू करण्यासाठी पावले उचलणार आहे. शिवाय स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी रद्द करण्यासाठीही पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाहीही अॅड. बनसोडे यांनी आज दिली. सोलापूर मतदारसंघात विजयी झाल्यानंतर मतदारसंघाच्या विकासासाठी अॅड. बनसोडे यांनी येथील उद्योजक, व्यापारी आणि चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली. चेंबरचे अध्यक्ष सिद्धेश्वर बमणी, प्रभाकर वनकुद्रे, प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन यतीन शहा, लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे, बालाजी उद्योग समूहाचे प्रमुख राम रेड्डी, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किशोर चंडक, विश्वनाथ करवा, चव्हाण उद्योग समूहाचे प्रमुख बाबू चव्हाण, जनता बँकेचे संचालक जगदीश तुळजापूरकर, यंत्रमागधारक संघाचे चेअरमन पेंटप्पा गड्डम, विमानतळ व्यवस्थापक संतोष कौलगी यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते. चेंबरचे अध्यक्ष बमणी म्हणाले, सोलापुरातील व्यापार्यांना करमुक्त करावे. शिवाय सोयीसुविधांमध्ये वाढ केल्यास सोलापुरात व्यापार-उद्योग वाढीस लागेल. यावर अॅड. बनसोडे यांनी स्थानिक संस्था कर रद्द करणे आणि शहर व औद्योगिक वसाहतींमध्ये सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. प्रिसिजनचे चेअरमन शहा म्हणाले, सोलापूरची चर्चा नेहमीच नकारात्मक होते. ही मानसिकता बदलली पाहिजे. विडी उद्योगाला संरक्षण देणे आवश्यक असून, नवी उद्योगाची चर्चा करण्यापेक्षा सोलापुरात सध्या जे उद्योग आहेत, ते टिकविण्यासाठी अस्तित्वातील उद्योगांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवली पाहिजे. सोलापूरची भारत संचार निगमची ब्रॉडबॅन्ड सेवा सुस्थितीत नाही. शिवाय येथे कुशल मनुष्यबळ मिळत नाही, असे सांगून लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे ठाकरे यांनी संसदेच्या येत्या अधिवेशनात वस्तू आणि सेवाकर लागू करण्याचा कायदा पारित करण्याचे आवाहन केले. करप्रणालीत सुसूत्रता आणि सोलापूरच्या कायदा-सुव्यवस्थेत सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा किशोर चंडक यांनी व्यक्त केली. बालाजी उद्योग समूहाचे रेड्डी म्हणाले, आम्हाला कोणतेही अनुदान नको; पण सुविधा द्या. रस्ते, वीज आणि विमानसेवा दिल्यास सोलापूरचा विकास कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या बैठकीस ‘क्रेडाई’चे सुनील फुरडे, डॉ. गिरीश कुमठेकर, रवी हलसगीकर, प्रशांत बडवे, सुरेश फलमारी आदी उपस्थित होते.
---------------------------
अशा आहेत अपेक्षा...
पेंटप्पा गड्डम : यंत्रमागधारकांना वीज आणि पाणी मुबलक मिळावे. कुंभारी परिसरात कामगारांची मोठी वसाहत आहे. तेथे नवीन औद्योगिक वसाहत विकसित व्हावी. सोलापुरात उद्योग भवन उभारावे. सुनील फुरडे : किल्ला आणि माळढोक विकासकांना अडथळा ठरत आहेत. हा प्रश्न तातडीने सुटावा. हैदराबादप्रमाणे अन्लिमिटेड एफएसआय मिळावा. जगदीश तुळजापूरकर : अॅड. बनसोडे यांनी दर महिन्याला एक समस्या सोडवावी, त्यामुळे आगामी साठ महिन्यात ६० प्रश्न सुटतील. अविनाश बच्चुवार : बांधकाम व्यावसायिकांना रॉयल्टी आणि वेगवेगळ्या परवान्याबाबत अडचणी येतात, त्या दूर व्हाव्यात. डॉ. गिरीश कुमठेकर : सिव्हिल हॉस्पिटल आणि महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रभाकर वनकुद्रे : रेल्वेचे दुहेरीकरण, कुर्डूवाडी रेल्वे कारखाना, पायाभूत सुविधांसाठी काम करावे.
------------------------
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सुरू केलेल्या योजना सुरूच राहतील. सोलापूरला शिंदे यांची उणीव भासू देणार नाही. उद्योजक आणि व्यापार्यांनी सहकार्य केल्यास मुंबई-सोलापूर-हैदराबाद विमानसेवा सुरू करू. - अॅड. शरद बनसोडे, खासदार, सोलापूर
------------------------------
होटगी रस्त्यावरील विमानतळावर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. विमाने उतरू आणि उडूही शकतात. विमान कंपन्या ज्या सुविधा मागतील त्या आम्ही तातडीने पूर्ण करून देऊ शकतो. - संतोष कौलगी व्यवस्थापक, सोलापूर विमानतळ