नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 11:15 PM2024-05-04T23:15:54+5:302024-05-04T23:16:39+5:30
अकलूज येथील सभेत शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा जोरदार समाचार घेतला आहे.
Sharad Pawar ( Marathi News ) : माढ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ अकलूज इथं आयोजित सभेत बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. "आम्ही निवडणूक लढवत आहोत, म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांना माळशिरस तालुका असो, सोलापूर जिल्हा असो, पुणे जिल्हा असो हे सगळे जिल्हे समजायला लागले. आम्ही ऐकायचो, कधीतरी वर्षातून, दहा वर्षातून एकदा नेहरूंची सभा ही सोलापूरला असायची. आता प्रधानमंत्री आठवड्याला येत आहेत. हा प्रधानमंत्री आम्ही समजत होतो, देशाचा प्रधानमंत्री असतो, पण आम्ही बघतो हल्ली ज्यावेळेस त्यांनी निवडणुकीला फॉर्म भरण्याचा निकाल घेतल्यानंतर हे देशाचे प्रधानमंत्री आमच्याकडे आठवडा मंत्री झाले. दर आठवड्याला येत आहेत. आत्ता पण येणार आहेत असं कळलं. एका अधिकार्याने सांगितलं, आम्ही गडबडीत आहोत, का तर प्रधानमंत्री यांची आणखी एक चक्कर या ठिकाणी आहे. या बाबा, आमची त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही हेलिकॉप्टरने येऊ नका, विमानाने येऊ नका. तुम्ही तुमची गाडी घेऊन या, आमचे रस्ते तरी नीट होतील," असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.
महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेल्याचा आरोप करत शरद पवार यांनी म्हटलं आहे की, "आज मोदी साहेबांच्या राज्यामध्ये कुठलाही नवीन प्रकल्प निघाला की ने गुजरातला. एक जगातली मोठी टेलिफोनची कंपनी आहे, त्यांनी तळेगावला जागा घेतली पुण्याच्या जवळ ८० हजार लोकांना काम देणार होतं. सरकार बदललं आणि मोदी साहेबांच्या काळात ती फॅक्टरी हलवली गुजरातमध्ये. एक औषधाची फॅक्टरी रायगड जिल्ह्यामध्ये होणार होती त्या ठिकाणी १० हजार लोकांना काम मिळणार होतं सत्ता बदलली आणि मोदी साहेबांच्या राजवटीमध्ये, ती औषधी कंपनी रायगडवरून हलवली आणि गुजरातमध्ये नेली कुठलाही महत्त्वाचा काम किंवा प्रकल्प या ठिकाणी निघाला रे निघाला, यांची नजर गेली तर लगेच आपल्या लक्षात येतं आता हे हलणार आणि ती कारखानदारी गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेला ते करतात. गुजरातही आमचा भाऊ आहे, त्याचा विकास होऊ नये असं आम्ही म्हणत नाही. पण गुजरातचा विकास होत असताना दुसऱ्या भावाच्या संबंधीचं त्याचं घरदार उभं करण्याच्या संबंधीचा घेतलेला कार्यक्रम बंद करायचा आणि तो दुसरीकडे हलवायचा ही भूमिका देशाचे नेतृत्व करणाऱ्यांना शोभत नाही, ते काम आज मोदींच्या काळामध्ये होत आहे," असा हल्लाबोल शरद पवारांनी केला आहे.
धैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारीविषयी काय म्हणाले शरद पवार?
धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांचा शरद पवारांनी उल्लेख केला आहे. "मला काही लोक म्हटले, लोकसभा एवढी मोठी, या तरुण माणसाला कशाला पाठवताय तिथं? कोणीतरी वडीलधारी पाठवायचा. मला मोठी गंमत वाटते, की अशा शंका लोक कसे करतात? लोकशाहीमध्ये काम करण्याची हिंमत, कर्तृत्व आणि समाजाची बांधिलकी या गोष्टी असल्यानंतर वय कधी आडवा पडत नाही. उदाहरण सांगायचं झालं, माझ्या वयाच्या २६ व्या वर्षी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेलो. २९ व्या वर्षी मंत्रिमंडळातला मंत्री झालो आणि ३७ व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, तिथं वय काही आडवं आलं नाही," असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, "उद्याच्या निवडणुकीला आपल्याला जागं व्हावे लागेल, निवडणुकीला त्यांना बाजूला ठेवावे लागेल तो निकाल आमच्या मतदानाच्या पद्धतीने दाखवलं पाहिजे की मोदी सत्तेवर राहणार नाहीत आणि शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, बेरोजगार तरुणांचा, आया- बहिणींचा, दलितांचा, आदिवासींच्या हिताचा विचार करणारा जो संघटन असेल त्याच्या पाठीशी शक्ती उभी करायची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून आज धैर्यशीलची उमेदवारी या ठिकाणी दिली. आपण उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी फार मोठ्या मतांनी त्यांना विजयी करा," असं आवाहन शरद पवार यांनी मतदारांना केलं आहे.