शरद पवार यांनी काँग्रेस सोडली नसती तर पंतप्रधान झाले असते - सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 04:58 PM2018-02-07T16:58:58+5:302018-02-07T17:02:58+5:30

शरद पवार जेव्हा नाही -नाही म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात बरेच काही असते असे सांगत शरद पवार यांनी जर त्यांनी काँग्रेस सोडली नसती तर ते आज पंतप्रधान झाले असते असा खुलासा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केला आहे

Sharad Pawar could have become PM claims Sushilkumar Shinde | शरद पवार यांनी काँग्रेस सोडली नसती तर पंतप्रधान झाले असते - सुशीलकुमार शिंदे

शरद पवार यांनी काँग्रेस सोडली नसती तर पंतप्रधान झाले असते - सुशीलकुमार शिंदे

Next

सोलापूर - शरद पवार जेव्हा नाही -नाही म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात बरेच काही असते असे सांगत शरद पवार यांनी जर त्यांनी काँग्रेस सोडली नसती तर ते आज पंतप्रधान झाले असते असा खुलासा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. 'शरद पवार आपले गुरु आहेत आणि ते अतिशय चलाख व शार्प आहेत. त्यांना पुढचे अर्थात वा-याची दिशा अगोदर कळते. असे गुरु आहेत हे माझे भाग्य आहे. पवार हे सर्वधर्म समभावाची पताका घेऊन पुढे निघाले आहेत', असे गौरवोद्गारही शिंदे यांनी काढले. 

केंद्रातील  आणि राज्यातील भाजपा सरकारने  शेतकरी आणि जनतेचे प्रश्न न सोडविल्यास आगामी निवडणूक  भाजपासाठी धोक्याची घंटा असल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात बुधवारी आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात सांगितले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण खूप जवळून पहिले आहे.  मुख्यमंत्री आणि हिमाचलचे प्रभारी असताना आम्ही भेटायचो. मात्र मोदी हे चहा विकत होते असे मला कधीच ऐकण्यात आले नाही. ते आत्ताच चहावाले झाले असावेत. असो चहावाल्यांसाठी त्यांनी आतातरी काही करावे असा टोला शिंदे यांनी मोदी यांना लगावला. 

नरेंद्र मोदी व्यक्तिगतरीत्या चांगले आहेत मात्र देश व राज्याची पॉलिसी ठरविताना चुकीचा निर्णय होतो. जीएसटी आणि नोटबंदीमुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला त्यामुळे देशभरातील जनता भाजपा सरकारवर नाराज आहे. शेतक-यांची कर्जमाफी आणि  रोजगाराचा प्रश्न सोडविला तरच भाजपा सुधारेल अन्यथा परिस्थिती बिकट होईल असा इशाराही शिंदे यांनी  बोलताना दिला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे प्लॅटो होते मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॅकेवेली आहेत. असे सांगत शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. 

दोनवेळा भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आले. परंतु ज्या त-हेने देशात त्यांनी काम केले त्यामुळे शेवटी-शेवटी ते ढासळले . त्यावेळी इंडिया शायनिंग झाले होते . आता  स्टॅन्डअप, सीटडाउन आणि स्लीप ऑफ इंडिया अशी भाजपची परिस्थिती झाली असल्याची कोपरखळीसुद्धा शिंदे यांनी यावेळी बोलताना मारली. 

लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित झाल्या तर त्याचा काँग्रेसला फायदा होईल. मात्र मतदान हे इलेकट्रोनिकऐवजी शिक्क्यानेच झाले पाहिजेत . नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रॉनिकस यंत्रात जादू केली असल्याची शंकाही शिंदे यांनी व्यक्त केली . 

सोनिया गांधी या परदेशी स्त्रीने भारताचे नागरिकत्व स्वीकारले व त्या भारतात विलीन झाल्या अशा सोनिया गांधींचे कौतुक करावे तितके कमीच आहे.  त्यांनी देशाला दहावर्षे सत्ता मिळवून दिली. मनमोहन सिंग यांना दहावर्षे पंतप्रधान केले. याशिवाय मोट्या मनाने राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष केले हे फक्त गांधी घराणेच करू शकते असे सांगताना शिंदे म्हणाले, राहुल गांधी अतिशय हुशार आहेत देशातील अनेक नेत्यांची नावे त्यांना पाठ आहेत. अध्यक्ष पदास त्यांनी चांगली भरारी मारली आहे. सुरुवातीला गांधी घराण्यावर आरोप झाले त्यानंतर मात्र त्यांची वाहवा होत गेली. तसेच राहुल गांधी यांच्या बाबतीत होणार असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. 

आयुष्यभर आपण विद्या विनयेणे शोभते अशाच पद्धतीने राजकारणात राहिलो आहोत. राजकारणात कोणाचाही सूड घ्यावा असे कधी मनात आलेच नाही मात्र कधीकधी येत गेलेल्या प्रसंगानुसार तसे होत गेले. असे सांगतानाच राजकारणात आज नाटकाचीच गरज असल्याचे सुशीलकुमारांनी स्पष्ठ केले. 

कोणतीही संस्था नाही, समाजाचा पाठींबा नाही मात्र शेड्युल्ड कास्ट म्हणून योग्यता मिळाली आणि पुढे सरकलो.  राजकारणात जनतेनेच पुढे रेटले . स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा समाजाने व लोकांनी आपल्याला पुढे रेटल्यामुळे आपण राजकारणात यशस्वी झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. राखीव व सर्वसाधारण जागेवर सोलापूरकर जनतेने आपल्याला आमदार व खासदार म्हणून निवडून दिले. तब्बल बारावीला जनतेने निवडून दिले असताना राग येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . असे सांगतानाच मागील लोकसभा निवडणुकीतील पराभव आपण आनंदाने स्वीकारल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

राजकारणात वैयक्तिक टीका करण्याचे राजकारणी मंडळींनी टाळले पाहिजे. कोणी आपल्याविषयी बोलले  असले तरी मनात ठेवून आपण बोलावे असे वाटत नसल्याचे सांगत शिंदे यांनी खासदार शरद बनसोडे यांचे नाव न घेता त्यांना टोला मारला. राजकारणात अबोला असून चालत नाही. विलासराव देशमुख आणि माझ्यात कधीच कटुता आली नाही असेही शिंदे यांनी सांगितले . आजकाल राजकारण हमरीतुमरीवर  चालले असून हे चुकीचे आहे. राजकारणात वैचारिक भूमिकेला महत्व असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान सोलापूरसाठी भरपूर काही केले आणि दिलेसुद्धा आहे आणि यापुढेही देतच राहणार आहे. बीएसएफ आणि सीआयएसएफ यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला पाहिजे. बोरामणी विमानतालसुद्धा झाले पाहिजे हीच आपली आता एकमेव इच्छा असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

आमदार प्रणिती शिंदे यांचे काम चांगले आहे. बोलताना ती फटकन बोलते अशावेळी कधीकधी अडचणी येतात. मी मात्र गोड बोलतो अन.. गोड बोलून ? ....  असे शिंदे म्हणताच एकच हशा पिकला.
 

Web Title: Sharad Pawar could have become PM claims Sushilkumar Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.