शरद पवारांनी बारामतीतील गायरान जमिनी लाटल्या !
By admin | Published: July 21, 2014 01:26 AM2014-07-21T01:26:18+5:302014-07-21T01:26:18+5:30
उद्धव ठाकरे : अजित पवारांवरही घणाघात
बार्शी : शरद पवारांनी बारामतीतील गायरान जमिनी लाटून त्यावर विद्या प्रतिष्ठानसारख्या संस्था उभ्या केल्याचे टीकास्त्र रविवारी येथील जाहीर सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले. उद्धव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावरही टीकेची झोड उठविली. भगवंताच्या बार्शीतला भगवा राज्यात फडकवा, असे आवाहन त्यांनी केले.
सत्तेत असताना शरद पवारांनी कधीही दुष्काळग्रस्तांसाठी केंद्रातून निधी आणण्यासाठी आपले वजन वापरले नाही. पण मोदी सत्तेवर येताच राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती पंतप्रधानांना सांगण्यासाठी भेटल्याचे सांगून आपले फोटो ते छापून आणत आहेत. सत्ता असताना महाराष्ट्राचे भले का केले नाही? असा सवाल करतानाच उद्धव यांनी दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांऐवजी पवारांना राज्यात २६ लवासासारखे प्रकल्प उभे करण्यात जास्त रस असल्याचा आरोप केला. गरिबांविषयी त्यांना कळवळा नाही. तर ‘हिल स्टेशन’ उभारण्यात त्यांना धन्यता वाटते, अशीही टीका त्यांनी केली.
शिवसेना सोडून गेलेले तडफडत आहेत. त्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. शिवसेनेमध्ये प्रेम आहे, असे सांगत सत्ताधाऱ्यांची पैशांची मस्ती वाढत आहे. त्यामुळे आपले सरकार येणारच आहे. विरोधकांना उमेदवार शोधावे लागत आहेत, असा टोला त्यांनी लागावला.
-----------------
स्वीट डिशची काळजी
गेल्या १५ वर्षांपासून आघाडी सरकारने खाण्याचेच काम केले आहे. सिंचनावर कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र त्याचा परिणाम किती झाला हे दिसत नाही. अजित पवारांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वीट डिशची चिंता जास्त आहे, असा टोला त्यांनी लगावला. नारायण राणे यांची सद्दी संपली असून त्यांना अस्तित्वासाठी सध्या लढावे लागत असल्याचे ते म्हणाले.