शरद पवारांनी संजयमामांना बळीचा बकरा बनविला; रणजितसिंह नाईक-निंबाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:32 PM2019-03-30T12:32:07+5:302019-03-30T12:34:43+5:30
रणजितसिंह निंबाळकर ‘लोकमत’ कार्यालयात : माढा लोकसभा मतदारसंघातील पडद्यामागील घडामोडींचा केला पोलखोल
सोलापूर : माढा मतदारसंघात विरोधात कौल आहे. त्यामुळे आपल्याला स्थान मिळणार नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी माघार घेतली व खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. मोहिते-पाटील यांनीही नकार दिल्यावर ऐनवेळी कोणाला तरी पकडायचे म्हणून संजय शिंदे यांना उमेदवारी देऊन बळीचा बकरा बनविला, अशी टिपण्णी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
माढा मतदारसंघात भाजपतर्फे फलटण येथील रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना शुक्रवारी भाजपतर्फे उमेदवारी जाहीर झाली. यावेळी नाईक-निंबाळकर यांनी ‘लोकमत’ कार्यालयात संवाद साधताना गेल्या दोन महिन्यांत माढा लोकसभा मतदारसंघात पडद्यामागे घडलेल्या घडामोडींचा पोलखोल केला.
प्रश्न: काँग्रेस सोडून अचानकपणे भाजपमध्ये येण्याचा का निर्णय घेतला?
उत्तर: राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास पाहिला तर ज्याला जो मतदारसंघ मिळेल तेथे ते राजे झाले. माझे वडील शिवसेनेचे खासदार होते. यावेळी त्यांनी उरमोडी, नीरा-देवधर, इतर योजना आणि रेल्वेचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून सरकारविरोधात जाऊन काम केले. यावेळी पाटबंधारे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच होते. या धरणांचे पाणी बारामतीला गेले. पण माळशिरस, सांगोला, खंडाळा, सोलापूरच्या भागाला पाणी मिळाले नाही. फलटणपर्यंत रेल्वेरुळ टाकले, पण काम पुन्हा थांबले. आमच्या सगळ्या योजनांना खिंडार पाडण्याचे काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले. आमचे कुटुंब व राजकीय कारकीर्द अडचणीत आणण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यामुळे या परिसरातील समविचारी नेत्यांनी एकत्र येऊन ठरविले की, आपण राष्ट्रवादीच्या विरोधात काम करायचे.
लोकसभा लागल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. त्यावेळी आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना स्पष्टपणे सांगितले होते की, आम्ही राजीनामे देऊ, पण आघाडीचा धर्म पाळणार नाही. गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामावर नाराज असलेली आमची मित्र कंपनी म्हणजे आमदार गोरे, शहाजीबापू पाटील, संजय शिंदे,उत्तमराव जानकर असे आम्ही राष्ट्रवादी विरोधात काम करण्यावर ठाम होतो. आमच्यावरील अन्याय दूर झाला पाहिजे, प्रसंगी सरकारबरोबर हातमिळवणी करून आपले प्रश्न मार्गी लावायचे, असे आमचे ठरलेले होते. हे लक्षात आल्यावर शरद पवार यांनी आमच्यातील एकाला गळाला लावून उमेदवारी दिली. त्यांना वाटले असावे हा एक आला की बाकीचे आपोआप येतील. माझी शरद पवार यांच्याशी दुश्मनी नाही. मात्र केवळ वीस किलोमीटर असलेली बारामती सुजलाम् सुफलाम् होते, पण आमच्या भागाविरूद्ध त्यांची दुटप्पी भूमिका असल्याने आवाज उठविण्याचे ठरविले. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना भेटून उमेदवारी मागितली. पवार यांच्याविरूद्ध लढण्याची आमची ताकद असल्याने भाजपाने उमेदवारी दिली.
प्रश्न: बºयाच वर्षांपासून मित्र असलेल्या संजय शिंदे यांच्याविरूद्ध निवडणूक लढविताना काय वाटते?
उत्तर: एका विशिष्ट प्रसंगातून माझी संजयमामांशी मैत्री झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण असो व इतर योजना असो होऊ दिल्या नाहीत. त्याचवेळी आम्ही ठरविले होते की, वाट्टेल ते करायचे, पण राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करायचा.
माढा लोकसभेसाठी शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केल्यावर आमची बैठक झाली. या बैठकीला संजयमामा हेही होते. पण नंतर त्यांनी आम्हाला सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. ठिक आहे. माझी लढाई संजयमामांविरूद्ध नव्हे तर सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे पाणी पळविणाºया बारामतीकरांविरूद्ध आहे.
प्रश्न: मुख्यमंत्र्यांना लोकसभा नको म्हणणारे संजयमामा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाताना चर्चा केली होती का?
उत्तर: संजयमामा यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्याबाबतीत का रस दाखविला, हे रहस्य मला माहीत नाही. पण राष्ट्रवादीत जाताना त्यांनी आमच्याशी चर्चा केली, हे खरे आहे. आमदार गोरे व मी त्यांना भेटलो. त्यावेळी त्यांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आॅफर असल्याचे सांगितले. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, आपले काय ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करायचा आणि आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात असाल तर मलाही भाजपची आॅफर आहे. त्यावर त्यांनी ऐकले नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावर समविचारी मित्रांशी चर्चा करून हा निर्णय घेतला.
प्रश्न: आता तुमच्याबरोबर कोण कोण आहेत, सोलापूर कसे कव्हर करणार?
उत्तर: राष्ट्रवादीचा पराभव करायचा म्हणून आम्ही जे एकत्र आलो होतो, त्यात संजयमामा सोडून सर्वजण माझ्याबरोबर आहेत. माळशिरसची जबाबदारी मोहिते—पाटील, पंढरपूर प्रशांत परिचारक, सांगोल्याची जबाबदारी शहाजीबापू पाटील पार पाडणार आहेत. पाणीप्रश्न हा काय फक्त माण, खटाव, फलटणचा नाही. करमाळा, सांगोला, माळशिरसच्या बºयाच मोठ्या भागाला पाणी मिळालेले नाही. पाण्यासाठी संघर्षावर आमचे एकमत आहे.
मैत्रीसाठी गळा कापणार नाही-निंबाळकर
- संजयमामा व तुमची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांना ही निवडणूक सोपी व्हावी म्हणून भाजपतर्फे उमेदवारी मॅनेज केली अशी चर्चा आहे, त्यावर काय म्हणणे आहे असे विचारल्यावर रणजितसिंह म्हणाले की, आमची निकराची लढाई आता देश पाहील. माझी लढाई संजयमामा नव्हे तर बारामतीकरांविरूद्ध आहे. मैत्रीसाठी मी लाखो लोकांचा गळा कापणार नाही.
‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले !
- माढा मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरली़ गेल्या दोन महिन्यांपासून या मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपतर्फे कोण निवडणूक लढविणार, याबाबत चर्चा होती़ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माघार घेतल्यावर खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, त्यांचे पुत्र रणजितसिंह यांची नावे चर्चेत आली़ अचानक संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली़ त्यानंतर भाजपतर्फे कोण, अशी चर्चा सुरु झाली़ मोहिते-पाटील पितापुत्राबरोबर सहकारी मंत्री सुभाष देशमुख यांचेही नाव चर्चेत होते़ रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी मिळणार हे वृत्त ‘लोकमत’ने प्रथम प्रसिध्द केले होते़ त्याच्यावर आज शिक्कामोर्तब झाले़ लोकमतचे वृत्त खरे ठरल्यानंतर दिवसभर जिल्ह्यात लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता.