शरद पवारांच्या गाड्यांचा ताफा सोलापुरात अडविणार; जनहित शेतकरी संघटनेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 10:47 AM2021-10-05T10:47:40+5:302021-10-05T10:47:48+5:30
प्रभाकर देशमुख : ‘जनहित’चे थकीत एफआरपी प्रकरणी आंदोलन
सोलापूर : थकीत एफआरपी प्रकरणी जनहित शेतकरी संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पूनम गेटवर जोरदार आंदोलन केले. साखर कारखानदारांना पाठीशी घालणारे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा ९ ऑक्टोबरचा साेलापूर दौरा होऊ देणार नाही. त्यांच्या गाड्यांच्या ताफा अडवू, असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर ऊर्फ भैय्या देशमुख यांनी दिला आहे.
सोमवारी दुपारी भैय्या देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह पूनम गेटवर मोर्चा आणला. कार्यकर्ते मोटारसायकलींवर पार्क चौकातून पूनम गेटवर येताना दिसताच फौजदार चावडी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पार्क चौकातच रोखले. सर्वांना ताब्यात घेतले. मोटारसायकली जप्त केल्या. यात भैय्या देशमुख पोलिसांची नजर चुकवून होम मैदानमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात घुसले. तेथून ते काही कार्यकर्त्यांसह पूनम गेटवर पोहोचले. पूनम गेटवर आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांना निवेदन दिले. थकीत एफआरपी प्रकरणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी १४ तारखेला सायंकाळी ५ वाजता साखर कारखानदारांचे संचालक तसेच व्यवस्थापकांची बैठक बोलावली. जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर देशमुख यांनी आंदोलन स्थगित केले.
मोर्चात सर्वाधिक शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांना शरद पवार शंभर कोटी रुपये कर्ज देऊन साखर कारखाना उभारण्यास मदत करतात. याउलट सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी देण्याकडे पवार दुर्लक्ष करतात. हा दुजाभाव कशासाठी, असा सवाल यावेळी देशमुख यांनी पवार यांना केला. सोलापूरकडे पवार यांची वक्रदृष्टी आहे. त्यामुळे त्यांना सोलापुरात येऊ देणार नाही. त्यांना जिल्हाबंदी करू, असे देशमुख बोलले.