शशिकला यांना सोलापुरातच मिळाले अभिनयाचे बाळकडू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 03:14 AM2021-04-05T03:14:26+5:302021-04-05T03:14:43+5:30
चित्रपटसृष्टीसह सोलापुरातील कलाक्षेत्रावरही शोककळा
सोलापूर : ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे रविवारी निधन झाले. त्या मूळच्या सोलापूरच्या. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह सोलापुरातील कलाक्षेत्रावरही शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे पूर्ण नाव शशिकला आनंदराव जवळकर. आईचे नाव लक्ष्मीबाई. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९३२ रोजी सोलापुरात झाला होता. शशिकला यांच्या जीवनात अनेक चढउतार आले. असं असलं तरी त्यांचं बालपण मात्र सुखवस्तू घरात गेलं होतं. त्यांच्या वडिलांचा उद्योग होता. शशिकला यांना एकूण सहा भावंडं होती.
वयाच्या पाचव्या वर्षापासूनच ही देखणी अभिनेत्री नृत्य, गायन व अभिनय करू लागली. सोलापुरातील श्रद्धानंद समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेत त्यांनी अनेक बक्षिसे जिंकली. काही काळानंतर त्यांचे वडील आनंदराव यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांचे कुटुंब सोलापूर सोडून मुंबई येथे गेले. वयाच्या विसाव्या वर्षी के. एल. सहगल कुटुंबातील ओमप्रकाश सहगल यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला.
सोलापूरला शेवटची भेट
शशिकला यांची सोलापूरची शेवटची भेट साधारणतः २००७-०८ सालची असावी. अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनासाठी शशिकला आल्या होत्या. प्रकाश यलगुलवार यांच्या मूकबधिर शाळेत रात्री भोजनासाठी त्या आल्या असता त्यांची भेट झाल्याचे नाट्यप्रेमी प्रशांत बडवे यांनी सांगितले.
शुक्रवार पेठेत घर : ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे घर शुक्रवार पेठेत आजही सुस्थितीत आहे. १९८३ मध्ये शशिकला यांचे भाचे मोहन जवळकर यांच्याकडून दिनेश कालेकर यांनी ते विकत घेतले. कालेकर कुटुंबीय शशिकला यांच्या घरामध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या या जुन्या घरामध्ये थोडासा बदल केला असला तरी आजही हे घर शशिकला यांच्यामुळे परिसरात ओळखले जाते.