‘ती’ लेडी सिंघम आमची मायमाऊली...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:00 PM2018-03-08T12:00:11+5:302018-03-08T12:00:11+5:30
केगांव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या पोलीस अधिक्षक कविता नेरकर-पवार यांनी गरिबीशी झुंज देत केला पोलीस खात्यात खडतर प्रवास
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी गुरू असतो, तो कडक स्वभावाचा़...भरपूर मेहनत करून घेणारा़...प्रसंगी कठोर होणारा़...पण लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या कविता नेरकर-पवार यांच्या अंगी हे गुण आहेतच, शिवाय ममता, प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता हेही गुण त्यांच्यात आवर्जून दिसून येतात़ म्हणूनच ती लेडी सिंघम पोलीस खात्यातील शेकडो पोलीस प्रशिक्षणार्थींची खरी मायमाऊली झाली आहे अशी भावना येथील प्रशिक्षणार्थींनी बोलून दाखविली़.
८ मार्च महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कविता नेरकर-पवार यांच्याशी तर गप्पा मारल्या पण त्यांच्याविषयी प्रशिक्षणार्थीना काय वाटते याविषयीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला़.
कविता नेरकर-पवार या मूळच्या नाशिक जिल्ह्यातील़ त्यांचे शालेय शिक्षण नाशिक येथील सी़डी़ओ मेरी हायस्कूल येथे तर पदवीचे शिक्षण नाशिक येथीलच पंचवटी कॉलेज येथे पूर्ण झाले़ त्यानंतर पदव्युत्तरचे शिक्षण नाशिक येथीलच के.टी़ एच़ एम़ कॉलेज येथे एम़ एस्सी इलेक्ट्रॉनिक्स विषयात झाले़ पूर्वीपासूनच कविता नेरकर-पवार यांना वाचनाची आवड होती़ .
या वाचनाच्या आवडीतून त्यांनी विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके वाचत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन सेवाक्षेत्रात करिअर करण्याचे ध्येय उराशी बाळगले होते़ याच ध्येयाच्या माध्यमातून २००९ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली़ पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याने माझी पोलीस उपअधीक्षक या पदावर निवड करण्यात आली़.
प्रारंभी नाशिक येथे पोलीस उपअधीक्षक पदाचे प्रशिक्षण पूर्ण केले़ त्यानंतर एका वर्षासाठी परिविक्षाधीन कालावधीसाठी सांगली येथे काम केले़ या प्रशिक्षण व परिविक्षाधीन कालावधीत पोलीस दलातील विशेष कामगिरी करता आली़ त्यामुळे माझी पहिली नेमणूक सांगली येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून झाली़ ही सेवा करताना विविध गुन्ह्यांचा तपास करताना चार गुन्ह्यातील आरोपीस शिक्षा झाली़ त्यानंतर दुसरी नेमणूक सहा़ पोलीस आयुक्त म्हणून पुणे शहरात काम करण्याची संधी मिळाली़ याठिकाणी दोन वर्षे सहा महिने काम करताना अनेकांना न्याय देण्याचे भाग्य लाभले़ हीच चांगली सेवा दिल्यामुळे माझी सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस अधीक्षक या पदावर काम करीत आहे़.
अन्यायाला वाचा फोडून इतरांना दिला न्याय
- कविता नेरकर-पवार हे नाव जरी ऐकले तरी अनेकांना थरकाप उडतो़. त्या जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम घेऊन गरिबीशी झुंज देत त्या पोलीस खात्यात आल्या़ अन्यायाला वाचा फोडताना त्यांच्याकडून न्यायच मिळतो इतका आत्मविश्वास अनेकांना आल्याचे त्यांच्या जीवनशैलीवरून दिसून येते़ कोणतेही काम असो ते होणार नाही असे उत्तर कधीच मिळत नाही़ सर्वसामान्य लोकांबरोबरच पोलीस खात्यातील सर्वच अधिकारी, कर्मचाºयांपासून ते शिपाई पदापर्यंत काम करीत असलेल्यांना सन्मानाची वागणूक देणे हे त्यांच्या अंगी असलेले महत्त्वाचे गुण़