‘ती’ ला न्याय हवा; सोलापूरकर संतापले; कठोर कारवाई करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 11:53 AM2020-02-14T11:53:12+5:302020-02-14T11:58:47+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनांचा पाऊस; विविध सामाजिक संघटनांच्या बैठका, आरोपींना अटक करण्याची मागणी
सोलापूर : विजापूर रोडवर महाविद्यालयीन युवतीवर झालेल्या सामुदायिक अत्याचाराच्या घटनेच्या सोलापुरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, विविध सामाजिक संघटना, समाज आणि राजकीय पक्षांच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन अत्याचार करणाºया नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. महिलांच्या हितासाठी कार्य करणाºया कार्यकर्त्यांनीही आपल्या भावना व्यक्त करून शहरातील युवती आणि महिलांच्या सुरक्षेची पोलिसांबरोबर नागरिकांंनीही काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. महाविद्यालयीन युवतींनी आपल्या भावना व्यक्त करताना नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
घटनास्थळांची केली पाहणी...
- अल्पवयीन मुलीवर ज्या ज्या ठिकाणी अत्याचार झाला त्या ठिकाणाला सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांनी भेट दिली. पीडित मुलीने अत्याचार करण्यात आलेली ठिकाणे दाखवली. शेत, माळरान शिवार, कार, रिक्षा, लॉज आदी ठिकाणे दाखवून अल्पवयीन मुलीने झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.
पीडितेने आत्महत्येचा घेतला होता निर्णय
- अल्पवयीन मुलगी जेव्हा अत्याचाराचा बळी ठरली तेव्हा तिच्यावर सातत्याने कृत्य घडण्यास सुरुवात झाली. एक म्हणता म्हणता अकरा जणांनी सामूहिक अत्याचार केला. हा अन्याय सहन होत नसल्याने ती मंदिराजवळ रडत बसली होती. सामाजिक कार्यकर्त्याने जेव्हा तिची विचारपूस केली तेव्हा ती प्रथमत: बोलत नव्हती. सुरुवातीला ती फक्त मला जगायची इच्छा नाही. मला मरायचं आहे, असे म्हणत होती. कार्यकर्त्याने विश्वासात घेऊन जेव्हा विचारणा केली तेव्हा तिने तिच्यावर झालेल्या सामूहिक अत्याचाराची माहिती सांगितली. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ११ जणांनी अत्याचार केल्याचे सांगताच सामाजिक कार्यकर्त्याने विजापूर नाका पोलिसांना फोन करून माहिती दिली. अल्पवयीन मुलगी ही आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
खटला जलदगती न्यायालयात चालवा..
सोलापूर : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी मोकाट असलेल्या अन्य आरोपींना अटक करून खटला जलदगती न्यायालयात चालवला पाहिजे. सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, असा सूर आज झालेल्या बैठकीत उमटला.
सामूहिक अत्याचारप्रकरणी चर्चा करण्यासाठी, समाजबांधवांच्या वतीने गुरुवारी दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. बैठकीस माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, अध्यक्ष युवराज पवार, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन कांबळे, महादेव भोसले, लहूजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, भीम आर्मीच्या दर्शना गायकवाड, रेशमा मुल्ला, प्रणोती जाधव, सुजाता वाघमारे, विशाखा उबाळे, गोविंद कांबळे, समाधान आवळे, विजय पोटफोडे, श्रीकांत देडे, शिवाजी गायकवाड, तानाजी जाधव, रोहित खिलारे, अनिल अलदर, राजू कांबळे, विकी पवार, लखन गायकवाड, सोहन लोंढे, विजय लोंढे, हिरा आडगळे आदी उपस्थित होते. माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे बैठकीत बोलताना म्हणाले, सोलापुरात घडलेली सामूहिक अत्याचाराची घटना निंदनीय आहे. प्रकरणाचा अर्धवट तपास झाला तर पीडित मुलीला न्याय मिळणार नाही. अत्याचार करणाºयांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशा प्रकारच्या विकृत प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवण्यात आला पाहिजे. पोलीस तपासात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, यासाठी सोलापूर बंद, मोर्चा अशी आंदोलने होतील, असे खंदारे यांनी यावेळी सांगितले.
समाज अध्यक्ष युवराज पवार म्हणाले, महिला-मुलींचा अनादर होत आहे, सोलापुरातील घटना भयंकर आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ म्हणणारे शासन नेमके मुली व महिलांच्या अन्याय-अत्याचाराच्या बाबतीत दुर्लक्ष का करते?. भीमा-कोरेगाव येथील नेत्र साक्षीदार महिलेचा खून करण्यात आला. तुगाव येथे एका मुलीचा बंदुकीचा धाक दाखवून खून करण्यात आला.
आता सोलापुरात सामूहिक अत्याचार घडला आहे. अत्याचार वाढत आहेत, प्रशासन मात्र गाफील आहे, असा आरोप यावेळी युवराज पवार यांनी केला. भीम आर्मीच्या दर्शना गायकवाड यांनी मुली सुरक्षित नाहीत, विकृतीला आळा घालणे आवश्यक आहे. अत्याचार झाला की पहिली जात पाहिली जाते. हा फक्त एका जातीचा नव्हे तर संपूर्ण स्त्री जातीचा प्रश्न आहे? असे मत व्यक्त केले.
कायद्यातील पळवाटांचा आरोपींना फायदा झाला नाही पाहिजे, असे मत यावेळी सुजाता वाघमारे यांनी मांडले. जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत शांत बसायचे नाही. महिला आहे तिला आपल्या मदतीची आवश्यकता आहे, असे मत प्रणोती जाधव यांनी मांडले. आरोपींना शिक्षा होईपर्यंत गप्प राहायचे नाही. सर्वांनी संघटित होऊन या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविला पाहिजे, आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे मत यावेळी विशाखा उबाळे यांनी मांडले.
पीडित मुलीला अन् नातेवाईकांना संरक्षण मिळावे!
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया ११ जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाच जणांना पहिल्यांदा अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना अद्याप अटक झाली नाही. राहिलेल्या आरोपींमध्ये राजकीय पुढाºयांचे नातेवाईक तसेच पोलीस अधिकाºयांच्या नातेवाईकांची मुले आहेत. राहिलेल्या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी. खटला जलदगती न्यायालयात चालवून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी. पीडित मुलीला व तिच्या आईला धमक्या व आमिष दाखवण्याची शक्यता असून, त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. हा प्रकार उघडकीस आणणाºया सामाजिक कार्यकर्त्यालाही धमक्या दिल्या जात आहेत, त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना समाजातर्फे देण्यात आले.