घटस्थापनेसाठी लागणारी माती विकून तिने केलीय घरच्या दसरा सणाची तजवीज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 02:49 PM2019-09-30T14:49:59+5:302019-09-30T14:52:32+5:30
चिमुकल्यांसह जगण्याचा संघर्ष; लोहारकामात पतीची मदत करून साहित्यांची विक्री
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : शहरातील चौका-चौकात घटस्थापनेचे साहित्य विकणारे लोक दिसतात. त्यातही बहुतांश महिलाच असतात. शारदीय नवरात्रोत्सवाचा सण हा स्त्री रुपातील शक्तीला वंदन करण्यासाठी असतो. मात्र हीच शक्ती आपल्या घरी सणाची तयारी करण्याऐवजी तळपत्या उन्हात आपल्या तान्हुल्याला घेऊन घटस्थापनेसाठी लागणारी माती आणि अन्य साहित्याची विक्री करण्यासाठी बसलेली दिसून आली. तुम्ही सण साजरा करणार नाही का, असा प्रश्न विचारल्यावर रुपाली आकाश चव्हाण या विक्रेत्या स्त्रीशक्तीने दिलेले उत्तर मनाला भिडणारे होते. त्या म्हणाल्या, त्यांच्या घरात घटस्थापना झाली तरच आमच्या घरात सण साजरा होईल...खरंच माती विकून घरच्या दसराची तजवीज करणाºया या नारीशक्तीचा संघर्ष भावणारा होता.
शहरातील अनेक भागांत घटस्थापनेच्या साहित्यांची विक्र ी करणाºया महिला दिसतात. त्या प्रत्येक महिलेची एक कहाणी असते. मोठ्या कष्टाने संसाराचा गाडा ओढणाºया आपल्या पतीला साथ देण्याची तर कधी स्वत:च पूर्ण संसार करण्याची जिद्द या स्त्रीशक्तीत असते. त्यापैकी एक म्हणजे रुपाली चव्हाण. त्यांचे पती हे लोहाराचा व्यवसाय करतात. त्यांच्या या कामात रुपाली चव्हाण या मदत करतात. मदत करणे म्हणजे घन चालविण्याचे काम, जे की खूप ताकद व मेहनतीचे असते.
या कामातून वेळ काढून रुपाली चव्हाण या घटस्थापनेचे साहित्य विकण्यासाठी आल्या होत्या.सोरेगाव येथूून काळी माती आणून त्याची विक्री त्या करत होत्या. सोबतच पाच विविध प्रकारची फळे, घटाच्यावर असणारे मंडपी (सळईचे मंडप) यांचीही त्या विक्र ी करत होत्या. स्वत: लोहार असल्यामुळे मंडपी त्यांनीच तयार केलेली होती. शनिवार व रविवार असे दोन दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत साहित्यांची विक्र ी करण्याचे काम त्या करत होत्या.
हे सर्व करत असताना आपल्या दोन मुलांची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असल्याने एका मुलीला त्यांनी आपल्यासोबत आणले होते. दीड वर्षाच्या मुलीला उन्हाचे चटके बसू नयेत यासाठी तिच्या डोक्यावर आपल्या पदराचा आसरा त्यांनी केला. घटस्थापनेच्या साहित्यांची लवकर विक्री करुन त्यांना आपल्या घरी घटस्थापना करायची होती. अशा परिस्थितीत त्यांच्या चेहºयावरील हास्य शक्तीदेवीचेच प्रतिरुप दिसत होते.
असेही ग्राहक
- एरव्ही मॉलमधून साहित्यांची खरेदी करत असताना त्याची किंमत विचारण्याची तसदी घेतली जात नाही. तर घटस्थापनेचे साहित्य खरेदी करताना अनेकांनी घासाघीस केल्याचे पाहायला मिळाले. घटस्थापनेचे साहित्य व फळांची किंमत ही अतिशय कमी असताना आणखी कमी किमतीत मागणारे ग्राहक होते. आम्हाला परवडले तर आम्ही विक्री करु नाहीतर करणार नाही, असे एका विक्रेत्याने सांगितले. तर सगळे साहित्य विक्री करुन मुहूर्त संपण्याच्या आत घरी घटस्थापना करायची असल्याने काही महिलांनी मिळेल त्या भावाने साहित्य विकले.