सोनं घेऊनच ती निघाली पुन्हा नांदायला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:21 AM2021-04-10T04:21:56+5:302021-04-10T04:21:56+5:30
टेंभुर्णी पोलीस व सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कल्याण ...
टेंभुर्णी पोलीस व सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कल्याण येथील शीतल अमित नवले (वय ३०) ही विवाहित महिला आपल्या दोन मुलांसह कंदर (ता. करमाळा) येथे आपल्या माहेरी आली होती. १७ जानेवारी रोजी तिची आई कालिंदी भोसले यांच्यासह टेंभुर्णी बसस्थानकावरून इंदापूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्या महिलेच्या बॅगमधील २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, १० ग्राम सोन्याची चेन व ५० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असलेली पर्स चोरून नेली. या घटनेनंतर शीतलच्या सासरकडील मंडळींनी सोने घेऊनच नांदायला ये, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे शीतलचे आई-वडील हातबल झाले होते.
दरम्यान, याच महिन्यात बसमध्ये चढत असताना दुसऱ्या एका महिलेचेही ३० ग्रॅम सोने चोरीस गेले होते. या दोन्ही गुन्ह्यांचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
पोलीस अधीक्षकांचा आदेश अन् चोरांचा तपास
या गुन्ह्याचा शोध लावण्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी टेंभुर्णी पोलीस व सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांना कडक आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी फिल्डिंग लावली. अखेर त्या चोरांना पकडण्यात यश मिळाले. या दोन्ही गुन्ह्यातील चोर सनी मोहन काळे, वरतन बळी शेंडगे दोघे रा. सोनारी, ता. परांडा यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्यापैकी ७१ ग्रॅम सोने परत मिळवले आहे. यामध्ये शीतल नवले यांच्या १ लाख ५९ हजार ११३ रुपये किमतीच्या ४२.१४० ग्रॅम वजनाचे सोने व दुसऱ्या महिलेचे १ लाख २१ हजार ८०३ रुपये किमतीचे २९.४२० ग्रॅम सोन्याचा समावेश आहे. तसेच या गुन्ह्यात वापरलेली ८ लाख रुपये किमतीची चारचाकी गाडीही जप्त केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काशीद हे करीत आहेत.
‘लोकमत’चे मानले आभार
शीतल नवले या विवाहित महिलेच्या नांदण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा हे प्रकरण ‘लोकमत’ने लावून धरले होते. सोने परत मिळाल्याने तिचा सासरी जाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, शीतल नवलेचे वडील बळीराम भोसले यांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.