शितल तेली-उगले यांची बदली; सचिन ओम्बासे सोलापूरचे नवे मनपा आयुक्त
By Appasaheb.patil | Updated: February 18, 2025 21:33 IST2025-02-18T21:23:43+5:302025-02-18T21:33:04+5:30
२१ नोव्हेंबर २०२२ मध्ये शितल तेली-उगले या सोलापूर महापालिका आयुक्त पदावर रूजू झाल्या होत्या. त्यांच्या काळात महापालिकेतील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली...

शितल तेली-उगले यांची बदली; सचिन ओम्बासे सोलापूरचे नवे मनपा आयुक्त
सोलापूर : महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांची बदली झाली असून त्यांच्या जागी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या सहीने १८ फेब्रुवारी २०२५ रोजी काढण्यात आले आहेत. दरम्यान, शितल तेली-उगले यांची नियुक्ती प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात आले.
२१ नोव्हेंबर २०२२ मध्ये शितल तेली-उगले या सोलापूर महापालिका आयुक्त पदावर रूजू झाल्या होत्या. त्यांच्या काळात महापालिकेतील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. याशिवाय उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामांना गती मिळाली. याचबरोबर स्मार्ट सिटी, परिवहन सेवा, स्वच्छता विभाग, बांधकाम विभाग, शहरातील मुख्य रस्ते, चौकाचौकाचे सुशोभिकरण, महापालिकेतील इंद्रभुवन इमारतीचे नूतनीकरण, स्काडा प्रणाली, इंदिरा गांधी स्टेडियम, शहरातील आरोग्य केंद्राचे नुतनीकरणही मोठया प्रमाणात करण्यात आले. उगले यांनी शहरातील विकासकामांना महत्व दिले. शासनाकडून मोठया प्रमाणावर निधी खेचून आणण्यात त्यांना यश मिळाले.
ओम्बासे लवकरच पदभार घेणार -
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना मुख्य सचिव व्ही. राधा यांनी आदेशात सांगितले आहे की, सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकार्यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार तेली-उगले यांच्याकडून स्वीकारावा असे नमूद केले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात ओम्बासे हे महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.