शेगावीचा राणा सोलापूर जिल्ह्यात दाखल; पालखीच्या स्वागतासाठी भक्तांची गर्दी
By Appasaheb.patil | Published: July 9, 2024 06:40 PM2024-07-09T18:40:40+5:302024-07-09T18:40:58+5:30
सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळे गावाच्या हद्दीत पालखीचे दिमाखात व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
सोलापूर : ओम गजानन... श्री गजानन... ज्ञानोबा, माऊली, तुकाराम...गण गण गणात बोते...जय गजानन श्री गजानन... विविध अभंगांच्या निनादाच्या जयघोषात ७५० किलोमीटर...३३ दिवसांचा प्रवास करीत शेगावहून पंढरपुरात विठ्ठलभेटीला निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळे गावाच्या हद्दीत पालखीचे दिमाखात व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, तहसिलदार किरण जमदाडे, सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, प्रल्हाद काशीद, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांच्यासह आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते. याशिवाय ७०० वारकरी, २५० पताकाधारी, ५५० टाळकरी, शेकडो स्वयंसेवकांसोबतच भक्तांच्या सुरक्षेला पोलिसांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
या सोहळ्यात वारकरी संप्रदाय, वाहन, वाद्य, घोडे बॅण्ड पथकाचा सहभाग आहे. या सोहळ्यात पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची मोठी गर्दी केली होती. आज उळे गावी पालखीचा सोलापूर जिल्ह्यातील पहिला मुक्काम असून सकाळी पालखी सोलापूर शहरात सकाळी नऊ वाजता दाखल होणार आहे. शहरात पालखीच्या स्वागताची तयारी करण्यात येत आहे.