मेंढपाळाची हौस ‘लय भारी’; सांगोल्यात चक्क ६० मेंढ्याचा हॅप्पी बर्थ डे सेलिब्रेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:07 PM2020-07-28T12:07:52+5:302020-07-28T12:08:52+5:30
बिरोबाच्या नावानंही झाला गजर; मेंढरावर मुलांप्रमाणे प्रेम करणाºया मेंढपाळाची कहानी
सांगोला : म्हणतात ना हौसेला मोल नाही मग ती मनुष्याची असो किंवा जनावरे, प्राण्यांची असो... अहो असेच काही तर घडलंय सांगोल्यात...स्वत: च्या मेंढरावर मुलांप्रमाणे जीवापाड प्रेम करणाºया मेंढपाळाने सलग दुसºया वर्षी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचे औचित्य साधून घरासमोर खांद्यावर घोंगडी, पिवळे फेटे बांधून ढोल, झांज वाजवून बिरोबाच्या नावानं चांगभलं... असा गजर करीत आपल्याकडील तब्बल ६० मेंढ्याचा वाढदिवस २ किलोचा केक कापून आनंदाने साजरा केला़ मेंढ्याच्या या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाची सोशल मिडियासह सांगोल्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
धनगर समाज बिरोबानंतर मेंढ्यानाच आपले दैवत मानतो हे सर्वश्रुत आहे़ धनगर समाज इतर जनावरांबरोबर मेंढरे पाळण्याचा व्यवसाय मोठ्या संख्येने करतात, कारण मेंढ्या वर्षातून दोन वेळा उत्पन्न देऊन लोकरेच्या माध्यमातून कुटूंबाचा आर्थिक विकास साधतात. त्यामुळे ते मेंढरांना आपले दैवत मानून जिवापाड प्रेम करतात.आपल्याकडे अगदी लहानपासून ते वयोवृद्धांपर्यंत फटाके फोडून मिष्टान्न भोजन, पार्टी देऊन वाढदिवस साजरा करण्याची प्रथा रुजत चालली आहे तर कोणाला चारचाकी , दुचाकी वाहनांचा तर कोणाला बैल जोडीचा वाढदिवस करण्याची हौसही न्यारी असते, त्याचप्रमाणे धनगर समाज मेंढरावर मुलांप्रमाणे जिवापाड प्रेम करतात त्यांनाही मनुष्याप्रमाणे वागणूक देत असल्याचे आपण पाहिले आहे.
सांगोला जुना मेडशिंगी रोडवरील मेंढपाळ सिद्धेश्वर गावडे व गावडे परिवाराच्यावतीने ६० मेंढ्या एकत्र करून त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालण्यात आले. यावेळी ढोल, झांज वाजवित बिरोबाच्या नावानं चागभलं.... बिरोबाच्या नावानं...अशा गर्जर करीत मेंढ्यासमोर २ किलोचा केक कापून उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सिध्देश्वर गावडे यांनी उपस्थित मान्यवरांचा पिवळे फेटे बांधून सत्कार केला़ शिवाय २० ते २५ कातरक-यांसह उपस्थितांना फराळ, मिष्टान्न भोजन देण्यात आले. याप्रसंगी सिद्धेश्वर गावडे, शरद गावडे धनगर समाजाचे माजी अध्यक्ष बाबू गावडे, माजी नगरसेवक तायाप्पा माने, सचिन गावडे यांच्यासह गावडे परिवारातील महिलाही सहभागी झाल्या होत्या.