शेवगा, वांग्याचेही भाव घसरले; मिरचीचा ठसका झणझणीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 05:46 PM2022-03-28T17:46:18+5:302022-03-28T17:46:23+5:30
आवक वाढल्याने कोथिंबिरीसह सर्वच पालेभाज्या स्वस्त
सोलापूर : जानेवारी, फेब्रुवारीत १२० रुपये किलोपर्यंत विकल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगा या महिन्यात ३० रुपयांवर आल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शेवग्याची आवक वाढल्याने भावात घसरण झाली आहे. आता भाव कमी झाल्यामुळे मनासारख्या शेवग्याचा चटपटीत मसाला शेंगा, सांबर करता येणार आहे.
शेवग्याच्या शेंगासोबतच बाजारात वांगे, कांदे, बटाटे, भेंडी, काकडी, टोमॅटो यांचेही दर कमी झाले आहेत. मात्र, हिरवी मिरची अद्याप ८० रुपये किलो मिळत असल्यामुळे अद्याप मिरचीचा ठसका झणझणीतच आहे. फेब्रुवारीत ८० रुपये किलोने विक्री होणारे वांगे आता ३० रुपये मिळत आहेत. ४० रुपये किलोने विक्री होणारे कांदे आता १० रुपये, तर १०० रुपये किलोने विक्री होणारी भेंडी आता ५० रुपयांनी मिळत आहे. मेथी १०, कोथिंबीर १० रुपयांना जुडी दिली जात आहे. लिंबाचे भाव मात्र वाढले असून, लिंबाची ११० रुपये किलो दराने विक्री होत असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले.
भाजीपाला सध्याचे दर फेब्रुवारीमधील दर
- - शेवगा ३०-१२०
- - वांगे ३०-८०
- - भेंडी ५०- १००
- - गवार ६०-१००
- - कोथिंबीर १०-३०
---
लिंबाची मागणी अन् भाव वाढले
अवकाळी पावसामुळे लिंबू पिकाचे मोठे नुकसान झाले यामुळे यंदा बाजारात लिंबाची आवक कमी झाल्याने भावात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ११० रुपये किलो दराने विकले जात आहेत.
म्हणून शेवगा स्वस्त
अतिवृष्टी झाल्याने शेवग्याचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे आवक घटली होती. परिणामी, शेवग्याचे दर १०० ते १२० रुपये किलोपर्यंत गेले होते. आता शेवग्याची आवक वाढल्यामुळे दरातही घसरण झाली म्हणून शेवगा स्वस्त झाला आहे.
---
पालेभाज्या स्वस्त
पालेभाज्यांची आवक वाढली. तुलनेत मागणी कमी असल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, करडई, राजगिरा, चुका, चवळई आणि पालक किरकोळ बाजारात दहा रुपये जुडी विकली जात आहे.
---
पालेभाज्यांचे दर सातत्याने कमी होत आहेत. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. स्वयंपाकात विविध प्रकारच्या भाज्यांचा वापर करणे शक्य झाले आहे. डाळीचे दर मात्र वाढलेले आहेत. त्यातूनही दिलासा मिळावा.
- गौरी स्वामी, गृहिणी
---
गेल्या आठवड्यापासून पालेभाज्यांचे दर तुलनेने कमी असल्यामुळे दिलासा मिळत आहे. मात्र, खाद्यतेल आणि किराणा साहित्याचे दरही वधारल्याने बजेट विस्कळीत होत आहे.
- ज्योती गायकवाड, गृहिणी
---