शिरापूरच्या पाटलाची सटकली.. गांजा लावण्यासाठी परवानगी मागितली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 10:35 AM2021-08-26T10:35:01+5:302021-08-26T10:36:55+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : शेतीत उत्पन्न मिळत नसल्याने माझ्या शेतात दोन एकर गांजा लावण्यास परवानगी मिळावी अशा आशयाचे निवेदन मोहोळ तालुक्यातील एका शेतकऱ्यानं दिल्याची माहिती समोर आली आहे.
अनिल आबाजी पाटील यांची शिरापूर (सो)., ता. मोहोळ येथे स्वत:च्या मालकीची जमीन गट नं. १८१/४ असून या क्षेत्रात दोन एकर गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी दयावी असे निवेदन जिल्हा व पोलीस प्रशासनाला दिले आहे.
अनिल पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी शेतकरी असून कोणतेही पिक केले तरी त्याला शासनाचा हमी भाव नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कवीडमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे.
मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही. त्यामुळे गांजाला चांगला भाव असल्यामुळे मला माझ्या वर नमुद गटामध्ये दोन एकर गांजा लागवड करण्याची दि. १५/०९/२०२१ पर्यंत लेखी परवानगी दयावी अन्यथा मी दि. १६/०९/२०२१ या दिवशी आपल्या प्रशासनाकडून परवानगी मिळाली असे गृहित धरुन मी लागवड सुरु करणार आहे व माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.