शिपाई झाला साहेब...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:18 PM2019-08-03T13:18:24+5:302019-08-03T13:22:13+5:30
‘कठीण परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही
आपण आपल्या जीवनात अनेक यशस्वी व्यक्तींचे जीवनचरित्र किंवा जीवनप्रवास वाचत आलो आहोत. आज मी आपणास एक स्फूर्ती आणि ऊर्जा देणारा माझा एक अनुभव सांगतो. मला आजपर्यंत अनेक कार्यक्रमांसाठी जाण्याचा योग येतो. त्यांना सन्मान करण्याची संधी मिळते. मी जेव्हा अशा कार्यक्रमास जातो तेव्हा तेथील यशस्वी आणि सत्कारमूर्तीकडून अनेक नवीन गोष्टी शिकत असतो. अशा गोष्टी शिकून मी माझ्या जीवनामध्ये त्या गोष्टींचे अनुकरण केल्याने माझ्या जीवनात अनेक बदल झाले आहेत.
किंबहुना या गोष्टी शिकण्यासाठीच मी अशा कार्यक्रमांचा स्वीकार करतो. अलीकडेच मला सोलापूर पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयात साईनाथ वंगारी यांचा सत्कार करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले गेले. वंगारी हे सध्या अन्नधान्य वितरण विभाग येथे सेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एम.ए. अर्थशास्त्र ही पदवी घेऊन सरकारी नोकरीसाठी परीक्षा देऊन सरकारी आॅफिसमध्ये सेवक या पदावर कार्य करण्यास सुरुवात केली. घरामध्ये असलेल्या सर्व सदस्यांचे योग्य पद्धतीने काळजी घेत सुखी संसार थाटलेला आहे. जेवढे वेतन आहे त्यात संसार सांभाळून चिकाटीने हे यश मिळवले हे खरेच कौतुकास्पद आहे. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महिला व बालकल्याण विकास अधिकारी परीक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादन केले. शासकीय क्लास-२ आॅफिसर म्हणून त्यांची निवड झाली आहे.
पुरेसे पैसे नसल्यामुळे अभ्यासासाठी ते कोणत्याही शिक्षकांकडे किंवा क्लासेसमध्ये न जाता दररोज २ ते ३ तास आणि सुटीच्या दिवशी दिवसभर अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. पुरेसे पैसे नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके खरेदी न करता सोलापूर पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयात जाऊन अभ्यास केला. त्यांना सलग तीन वर्षे या परीक्षेमध्ये अपयश मिळाले. हे यश मिळवण्यासाठी त्यांनी सलग चार वर्षे न खचता, जिद्दीने, सातत्याने कठीण परिश्रम, समर्पण, अनेक संकटांवर मात, संयम ठेवून, चिकाटीने अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.
या कार्यक्रमाच्या दरम्यान सत्कारमूर्ती वंगारी यांच्या यशाची गाथा आणि त्याचे रहस्य ऐकल्यानंतर मला अजून परिश्रम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली. अशा यशस्वी विद्यार्थ्यांच्या सान्निध्यात राहण्याची संधी मी कधी चुकवत नाही. या कार्यक्रमातून मला एकच संदेश मिळाला तो म्हणजे यश मिळण्यासाठी कठीण परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण यशस्वी माणसांची कथा वाचत असतोच. त्याच्यापासून आपणास ऊर्जा मिळतेच, पण आपण जर समाजामध्ये सतर्क आणि डोळे उघडून नजर टाकल्यास आजूबाजूला प्रसिद्धीपासून दूर असलेल्या अशा अनेक व्यक्तीपासूनसुद्धा बोध आणि चांगला संदेश मिळू शकतो.
वंगारी यांच्या सेवक ते साहेब या यशस्वी प्रवासाबद्दल हार्दिक अभिनंदन. त्यांच्या पत्नी यासुद्धा एम. ए. अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर आहेत. आता वंगारी त्यांच्या पत्नीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित असलेल्या परीक्षेसाठी प्रोत्साहन देत आहेत. त्यांनासुद्धा आमच्या अनेक शुभेच्छा. हे यश संपादन करण्यात सोलापूर पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचा मोठा वाटा आहे. मी त्यांचेसुद्धा अभिनंदन करतो. येथे विद्यार्थी शिक्षकांशिवाय एकत्र, गट चर्चा करीत, एकमेकांना मदत, सहकार्य करीत अभ्यास करीत आहेत. या वाचनालयाने मागील काही वर्षांमध्ये १४ विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविले आहे.
या यशस्वी व्यक्तीकडून यश मिळण्यासाठी ‘कठीण परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही’ आणि ‘आयुष्यात अपयश मिळाले म्हणून खचून न जाता त्यावर संयमाने, जिद्दीने आणि चिकाटीने मात करता येते’ हा संदेश मला मिळाला आहे.
- डॉ. व्यंकटेश मेतन
(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ आहेत.)