शिरोली टोलनाक्याचा बुक्का

By admin | Published: December 30, 2014 12:10 AM2014-12-30T00:10:28+5:302014-12-30T23:41:27+5:30

‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे कृत्य : तीन केबीन उलटवल्या; शाहू टोल नाक्यावर तणाव : काटेंना धक्काबुक्कीचे पडसाद

Shiroli Tolnaakya Bukka | शिरोली टोलनाक्याचा बुक्का

शिरोली टोलनाक्याचा बुक्का

Next

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांना धक्काबुकी केल्याचे पडसाद आज, सोमवारी ‘आयआरबी’च्या वतीने टोलवसुली सुरू असलेल्या शिरोली नाक्यावर दुपारी उमटले. संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी नाक्यावरील केबीन उचकटून टाकल्या व त्यांचा बुक्का केला. त्यानंतर हेच कार्यकर्ते उजळाईवाडी (ता. करवीर) येथील शाहू टोलनाक्यावर गेले पण, पोलीस वेळीच आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला. शिरोली टोलनाका फोडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. हा प्रकार समजल्यानंतर सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते शिरोली टोलनाक्यावर आले दुपारी चारनंतर उलटलेल्या केबीन पुन्हा लावल्यामुळे कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. केबिन लावण्यासाठी आणलेला के्रनच्या काचाही अज्ञातांनी फोडल्या. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. शाहू टोलनाक्यावर पळून जाणाऱ्या ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष भगवान काटे व त्यांचे मित्र राहुल घोरपडे हे दोघे जण काल (रविवारी) रात्री उजळाईवाडीकडे शाहू टोलनाक्यावरून निघाले होते. त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचारी अमोल पाटील या कर्मचाऱ्याबरोबर त्यांचा वाद झाला. या वादातून काटे व घोरपडे यांना धक्काबुक्की झाली. त्याचा राग कार्यकर्त्यांत होता. त्यामुळे आज, सोमवारी दुपारी संघटनेचे कार्यकर्ते मार्केट यार्ड येथील लोणार वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकत्र जमले. दुपारी तीनच्या सुमारास पक्षाचे झेंडे फडकावत व घोषणाबाजी करत सुमारे शंभर ते दीडशे कार्यकर्ते शिरोली टोलनाक्याच्या दिशेने चालून गेले. कार्यकर्ते आल्याचे पाहताच नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वसुली बंद करून धूम ठोकली. तोपर्यंत कार्यकर्ते नाक्यामध्ये घुसले. त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांसमोरच केबीनची मोडतोड केली. केबिन्स उचकटून टाकल्या. केबीनची मोडतोड केल्यानंतर त्यांनी शाहू टोलनाक्याकडे मोर्चा वळविला.
पोलिसांनी हा प्रकार समजल्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी यांच्यासह पोलीसांची फौज घटनास्थळी आली. त्यावेळी आयआरबीचे व्यवस्थापक थोरात व कर्मचाऱ्यांनी घडल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. थोरात यांनी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन व घोषणाबाजी करत या टोलनाक्यावर आल्याचे पोलीस निरीक्षक चौधरी यांना सांगितले. हा टोलनाका फोडल्याचा प्रकार समजताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे पोलीस फौजफाटा घेऊन तातडीने आले.
हा प्रकार समजताच टोल समितीचे नेते निवासराव साळोखे, बाबा पार्टे, अशोक पोवार,अजित सासने, महेश सासने आदी कार्यकर्ते शिरोली टोलनाक्यावर आले. त्यावेळी अज्ञातांनी क्रेन फोडली. त्यामुळे पुन्हा वातावरण तणावपूर्ण बनले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात टोलवसुली पुन्हा सुरू झाली. तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शाहू टोलनाक्यावर आले. कार्यकर्ते आल्याचे पाहताच नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वसुली बंद केली. त्याठिकाणी दहा ते १५ मिनिटे कार्यकर्ते थांबले. याचवेळी पोलीस निरीक्षक गोडसे या टोलनाक्यावर आले. पोलीस आल्याचे पाहून तेथून कार्यकर्ते पसार झाले.



७० ते ८० कार्यकर्त्यांवर गुन्हा; सुमारे तीन लाखांचे नुकसान
शिरोली टोलनाक्यावर आज दुपारी झालेल्या तोडफोडप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ७० ते ८० जणांवर शाहूपुरी पोलिसांत रात्री गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद किरण धर्माजी घाटगे (वय ३५, रा. टोप, ता. हातकणंगले) यांनी दिली.
‘आयआरबी’ कंपनीची शिरोली टोलनाक्यावर ‘बीओटी’ तत्त्वावर वसुली सुरू आहे. आज झालेल्या तोडफोडीमध्ये या नाक्याचे सुमारे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे. टोलवसुली बंद करावी, या मागणीसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर भारतीय दंडसंहिता विधान कलम १४३ (जमाव), १४७ (दगड मारणे) व १४९ (समान हेतू), तसेच ४२७ (नुकसान) याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणास अटक करण्यात आली नव्हती.


टोल आंदोलन पुन्हा पेटणार
जोपर्यंत टोलचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत टोलचा उद्रेक होणार असल्याची चिन्हे आज, सोमवारी झालेल्या शिरोली टोलनाक्यावरील तोडफोडीवरून दिसते. काल (रविवारी) टोलविरोधी कृती समितीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दिलेल्या आश्वासनानंतर उद्या (मंगळवारी) पुकारलेला नियोजित मेळावा स्थगित केला. टोल समितीचे कार्यकर्ते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांना रविवारी रात्री धक्काबुक्की झाली. या प्रकारामुळे पुन्हा एकदा टोल आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
------------
पोलीस यंत्रणा झाली खडबडून जागी
शिरोली टोलनाक्यावरील प्रकारानंतर शहरातील चारही पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी ज्या-त्या हद्दीतील टोलनाक्यांवर पोलिसांची गस्त वाढवली आहे. सध्या जिल्'ात प्रत्येक पोलीस ठाण्याची तपासणी सुरू आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

दोन तासांनंतर वसुली झाली पुन्हा सुरू
सोमवारी दुपारी सव्वा तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिरोली टोलनाक्यावरील केबीन कार्यकर्त्यांनी उचकटली. त्यानंतर तासाभरानंतर नाक्यावरील व्यवस्थापनाने के्रनच्या सहाय्याने त्याच ठिकाणी पुन्हा केबीन उभारल्या. त्यानंतर सायंकाळी पाचनंतर टोलवसुली पुन्हा सुरू झाली.

टोल समितीला केले बेदखल...
टोलविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते घडल्या प्रकारानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले. पालकमंत्री पाटील आपली बैठक आटोपून जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्यासह बाहेर पडत असताना कृती समितीने पाटील यांच्या कानावर हा प्रकार घालत असतानाच त्यांनी ‘मी गडबडीत आहे’ असे सांगत शेजारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती घेण्यास सांगत तेथून निघून गेले.




टोलनाक्यावर चळवळीतील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्याचे काहीच कारण नव्हते. ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांना भगवान काटेंविषयी काही तक्रार होती, तर त्यांनी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांकडे धाव घ्यायला हवी होती. परंतु, त्यांनी थेट कायदा हातात घेत काटेंसारख्या समंजस नेत्यांना धक्काबुक्की केली, हे कितपत योग्य आहे. त्याचे पडसाद उमटणे साहजिकच आहे. टोलबाबत नव्या सरकारने काहीतरी पटकन निर्णय घेणे गरजेचे आहे. कॉँग्रेस आघाडी सरकारप्रमाणे चालढकल केल्यास ते भविष्यात अडचणीचे ठरू शकेल.
- राजू शेट्टी, खासदार.


टोलनाक्यावर ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांशी समजूतदारपणे बोलत असताना त्यांनी मग्रुरीची भाषा वापरत आपल्याला धक्काबुक्की केली. त्याचे पडसाद आज उमटले. त्यांनी अद्यापही सुधारावे. दोन महिन्यांत त्यांचा गाशा आम्ही गुंडाळणार आहोत. जाताना त्यांनी सरळ जावे, अशी इच्छा आहे. नाही तर आमच्याशी गाठ आहे.
- भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
-------------------------




शिरोली टोलनाक्यावर घडल्या प्रकारानंतर शहरातील सर्व टोलनाक्यांवर पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. शिरोलीसह शाहू टोलनाक्यांवरील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
- भारतकुमार राणे, शहर पोलीस उपअधीक्षक, कोल्हापूर.



फोटो : २९१२०२१४-कोल-शिरोली नाका ०३
कोल्हापुरात सोमवार शिरोली टोलनाक्यावरील केबिनची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. यावेळी नाक्यावरील उचकटलेली केबीन. ( छाया : नसीर अत्तार,दीपक जाधव)
 

Web Title: Shiroli Tolnaakya Bukka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.