सोलापूरातील उड्डाणपुलांना शिवसेनेचा विरोध; विकासाला खीळ नको : भाजप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 02:34 PM2018-10-20T14:34:17+5:302018-10-20T14:36:55+5:30
नवा तिढा : चार नगरसेवकांचा सभासद प्रस्ताव; विशेष सभा बोलाविण्याची मागणी
सोलापूर : शहरात दोन उड्डाणपूल करण्याऐवजी बाह्यवळण रस्ते विकसित करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे. उड्डाण पुलाला १ हजार कोटी रुपये खर्च होतील. त्याऐवजी १५० कोटी रुपये खर्च केले तर बाह्यवळण रस्त्यांच्या माध्यमातून एक रिंगरुट तयार होईल. यातून जड वाहतुकीचाही प्रश्न सुटेल, अशा आशयाचा सभासद प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो नगरविकास सचिवांकडे सादर करण्यात येत आहे.
केंद्रीय रस्ते, वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील जुना पुणे नाका ते पत्रकार भवन चौक आणि जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला यादरम्यान दोन उड्डाण पूल मंजूर केले आहेत. या कामासाठी ८७३ कोटी रुपये देण्याची घोषणाही केली आहे. या उड्डाण पुलांच्या भूसंपादनासाठी २९९ कोटी रुपये महापालिकेला देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने २०९ कोटी रुपये मंजूर केल्याचा आदेशही काढला आहे.
परंतु, यादरम्यान शिवसेनेच्या नगरसेवकांनी उड्डाण पुलांऐवजी बाह्यवळण रस्त्यांच्या कामांना प्राधान्य द्या, अशी मागणी केली आहे. या संदर्भातील सभासद प्रस्ताव नगरसेवक प्रथमेश कोठे, राजकुमार हंचाटे, गुरुशांत धुत्तरगावकर, विठ्ठल कोटा यांच्याकडून नगरविकास सचिवांकडे शनिवारी दाखल केला जाणार असल्याचेही शिवसेनेच्या पदाधिकाºयांकडून सांगण्यात आले. यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणीही शिवसेना नगरसेवक करीत आहेत.
१५० कोटी रुपयांत रिंगरुट होईल
- विरोधी पक्षनेते महेश कोठे म्हणाले, सोलापूर शहरात उड्डाण पुलाची गरज नाही. १५ मिनिटांत आपण शहराच्या एका भागातून दुसºया भागात जाऊ शकतो. उड्डाण पुलांवरुन फारशी जड वाहने जाणार नाहीत. बाहेरुन येणाºया जड वाहनांसाठी बाह्यवळण रस्ते विकसित करण्याची गरज आहे. उड्डाण पुलासाठी ८७३ कोटी रुपये तर भूसंपादनासाठी ३०० कोटी रुपये खर्च होतील. याउलट १५० कोटी रुपयांत बाह्यवळण रस्त्याचे भूसंपादन आणि इतर कामे होतील. मुख्यमंत्र्यांनी भूसंपादनासाठी ३०० कोटी रुपये मंजूर केले. प्रत्यक्षात नगरविकास विभागाने २०९ कोटी रुपये मंजूर केले आणि ८९ कोटी रुपये महापालिकेने द्यावेत, असे आदेश दिले. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. या परिस्थितीत ८९ कोटी रुपये दिल्यास सोलापूरकरांवर नाहक बोजा पडणार आहे. भूसंपादनाला ३०० कोटी रुपये देण्याऐवजी महापालिकेला विकासकामांसाठी विशेष अनुदान द्यावे. गेल्या दोन वर्षांपासून नगरसेवकांना विकास निधी मिळालेला नाही. नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रभागात फिरणे मुश्कील आहे.
काँग्रेस-माकपचा विरोध
- काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यापूर्वी उड्डाण पुलाला विरोध दर्शविला आहे. सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा झाली होती. बहुमताने हा विषय मंजूर करण्यात आला होता. आता शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट सभासद प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे या विषयावरून पुन्हा राजकारण रंगणार आहे.
प्राधिकरणाकडे रिंगरुटचा प्रस्ताव तयार
- राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने सोलापूर-पुणे, सोलापूर-तुळजापूर, सोलापूर-हैदराबाद आणि सोलापूर-विजयपूर महामार्गांना जोडणाºया एका रिंगरुटचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये केगाव ते हत्तूर, हत्तूर ते उळे यादरम्यानच्या रस्त्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी यासंदर्भात बैठकही घेतली होती. शिवसेनेने आता याच प्रस्तावावर जोर दिला आहे.
विरोधाला विरोध करु नका
- सभागृह नेते संजय कोळी म्हणाले, नगरोत्थानच्या माध्यमातून बायपास केले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून इतर बायपासचे काम पूर्ण करु. या कामासाठी आम्ही तुमच्यासोबत येऊ. पण उड्डाण पुलाला विरोध करु नका. शहराला एवढा मोठा विकास निधी मिळतोय. त्याचे स्वागत करायला हवे. यामुळे शहरातील वाहतुकीची समस्याही सुटणार आहे. मोठ्या वाहनांबरोबरच लहान गाड्यांचीही व्यवस्था होईल. विकासाला खीळ घालण्याचे काम कुणीही करु नये. या कामामुळे काही राजकीय नेत्यांच्या चाळीच्या जागा जाणार आहेत. पण उड्डाण पुलाला विरोध म्हणजे विरोधाला विरोध करण्यासारखे आहे.