श्री विठ्ठल मंदिर समितीवर असणार शिवसेनेचा अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:17 AM2020-12-09T04:17:54+5:302020-12-09T04:17:54+5:30
पंढरपूर : श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीवर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह वारकरी प्रतिनिधीही आहेत. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यामुळे ...
पंढरपूर : श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीवर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह वारकरी प्रतिनिधीही आहेत. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यामुळे मंदिर समिती बरखास्त करून नवीन समिती गठित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून सामाजिक व न्याय्य विभागाकडून मंदिर समिती बरखास्त करण्याबाबत माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर समितीवर शिवसेनेचा अध्यक्ष असणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांद्वारे मिळाली आहे.
महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सरकारने अनेक महामंडळे बरखास्त केली; परंतु देवस्थान समित्यांमध्ये बदल केले नाहीत. भाजपच्या ताब्यातील देवस्थान समित्या काढून घेण्यासाठी राज्यपातळीवर हालचाली सुरू आहेत. आघाडीतील मित्रपक्षांनी समित्या वाटून घेतल्या आहेत. त्यानुसार पंढरपूरची मंदिर समिती शिवसेनेकडेच राहणार आहे.
भाजपाच्या कोट्यातून झालेले श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेले अतुल भोसले यांनी यापूर्वीच आमदारकीच्या निवडणुकीसाठी राजीनामा दिला होता; मात्र त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला होता. ते निवडणूक तर जिंकलेच नाहीत; परंतु त्यांना मंदिर समितीचे अध्यक्षपददेखील राखता आले नाही. त्यामुळे मंदिर समितीचा कारभार सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसकर हे पाहत आहेत.
वर्णी लावण्यासाठी हालचाली
मंदिर समितीवर अनेक सदस्य भाजपाचे आहेत. यामुळे त्यांच्या ठिकाणी आपली वर्णी कशी लावता येईल, यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील आपआपल्या पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
----