‘नाम काफी है,’ म्हणणाऱ्या मोहिते-पाटलांच्या अकलूजमध्ये शिवसेना सांगते, ‘करून दाखवलंं’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:26 AM2021-08-12T04:26:44+5:302021-08-12T04:26:44+5:30
श्रीपूर : अकलूज- माळेवाडी नगर परिषद आणि नातेपुते नगरपंचायतचा अंतिम आदेश निघाल्यानंतर सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्याबरोबर ...
श्रीपूर : अकलूज- माळेवाडी नगर परिषद आणि नातेपुते नगरपंचायतचा अंतिम आदेश निघाल्यानंतर सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्याबरोबर बॅनरबाजीसुद्धा अकलूजकरांना पाहावयास मिळाली. त्यात शिवसेनाने पवार-ठाकरेंचा फोटो लावून ‘शिवसेना फक्त बोलतच नाही तर करून दाखवते!’ तसेच मोहिते-पाटील समर्थकांनाही ‘मोहित-पाटील नाम ही काफी है!’ असे बॅनर पाहावयास मिळत आहेत. या बॅनरची सर्वत्र चर्चा होत आहे.
अकलूजकरांना वाढदिवसाचे बॅनर पाहायची सवय होती. आता मोहिते-पाटील समर्थक व शिवसेना यांनी अशा पद्धतीचे बोर्ड लावले आहेत. त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. अकलूज-माळेवाडी नगर परिषद व नातेपुते नगरपंचायतसाठी मोहिते-पाटील यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यासाठी ४३ दिवस साखळी उपोषण करण्यात आले. त्यांनी राज्यपालांपासून ते उच्च न्यायालयापर्यंत हा विषय नेटाने नेला. शेवटी नगरविकास मंत्रालयाने अंतिम आदेश काढला त्यामध्ये मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नाला यश आले, अशी चर्चा चालू असताना ‘शिवसेनेने करून दाखवले’ असे बॅनर अकलूज चौकात शिवसेनेने झळकवली आहेत, तर दुसरीकडे मोहिते- पाटील समर्थकांनी ‘नाम ही काफी है!’ अशी बॅनर लावली आहेत. त्यातच पालकमंत्री राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरून अकलूज- माळेवाडी नगर परिषद व नातेपुते नगरपंचायत झाल्याचे बोलून गेले. त्यामुळे श्रेय घेण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तिघांची धडपड चालू असल्याचे जनतेला दिसून येत आहे.
----
‘नाम ही काफी है!’ : ‘करून दाखविलं !’
अकलूज-माळेवाडी नगर परिषद व नातेपुते नगरपंचायत झाल्याबद्दल चौकात बॅनर झळकू लागले. त्यात अकलूजच्या मुख्य चौकात मोहिते-पाटील समर्थकांनी देवेंद्र फडणीस, विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचे फोटो टाकून ‘मोहिते-पाटील नाम ही काफी है!’ अकलूज ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाले... त्याबद्दल सर्व मोहिते-पाटील परिवाराचे हार्दिक अभिनंदन, तर शिवसेनेने सदाभाऊ चौक, गांधी चौक, महर्षी चौक, प्रतापसिंह चौक या ठिकाणी स्व. बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, गजानन कीर्तिकर आदी आमदार, खासदार व जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो टाकून ‘शिवसेना फक्त बोलतच नाही, तर करून दाखवते!’ अकलूज-माळेवाडी नगर परिषद व नातेपुते नगरपंचायत केल्याबद्दल महाविकास आघाडीचे सरकारचे हार्दिक अभिनंदन, अशी बॅनर्स लावलेली पाहायला मिळत आहेत.
राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने हा निर्णय घेतला आहे : पालकमंत्री दत्तात्रय भरणे
राष्ट्रवादी नेत्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय झाल्याचे सातत्याने पालकमंत्री भरणे सांगू लागल्यामुळे जिल्ह्यात अधिकच चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री मागील आठवड्यात माळशिरसमध्ये एका कार्यक्रमांमध्ये बोलत होते. अकलूज-माळेवाडी नगर परिषद व नातेपुते नगरपंचायत निर्णय राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने हा निर्णय घेतलेला आहे. महाविकास आघाडीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी एखाद्या निर्णयाला होय म्हटल्याशिवाय कोणताही निर्णय होत नाही. अजित पवार यांनीच एकनाथ शिंदे यांना सांगितले होते.