Maharashtra Election 2019; शिवसेनेचे दिलीप माने कुटुंबीयांकडे ३० कोटी रुपयांची संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 10:47 AM2019-10-04T10:47:29+5:302019-10-04T10:51:45+5:30
शहर मध्य विधानसभा मतदारसंघ; कामगार नेते आडम मास्तर यांच्याकडे ४५ लाखांची संपत्ती
सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाºया प्रमुख चार पक्षांच्या उमेदवारांमध्ये शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. माने कुटुंबीयांकडे जवळपास ३० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यानंतर फारुक शाब्दी यांच्या नावे दहा कोटी रुपयांची संपत्ती आहे. प्रणिती शिंदे यांच्या नावे साडेचार कोटींची संपत्ती आहे. कामगार नेते नरसय्या आडम यांच्याकडे ४५ लाख रुपयांची संपत्ती आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी निवडणूक कार्यालयाकडे शपथपत्र सादर केले आहे. यात व्यक्तिगत माहिती, संपत्तीचे विवरण, दाखल गुन्हे आदींची माहिती आहे. शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. माने यांच्या नावे एक दुचाकी, दोन ट्रॅक्टर आहेत तर १५ लाख रुपयांचे दागिने आहेत. माने यांच्या पत्नी जयश्री यांच्या नावे २२ लाख ६४ हजार ४०० रुपयांचे तर मुलगा पृथ्वीराज यांच्या नावे १ लाख ११ हजार रुपयांचे दागिने आहेत.
दिलीप माने यांच्या नावावरील एकूण जंगम मालमत्तेचे मूल्य ९० लाख ११ हजार १४० रुपये आहे. पत्नी जयश्री माने यांच्या नावावरील मालमत्तेचे मूल्य १ कोटी ६८ लाख ९ हजार रुपये आहे. मुलगा पृथ्वीराज यांच्या नावावरील मालमत्तेचे मूल्य ८३ लाख ३२ हजार रुपये आहे. तिघांच्या नावावरील एकूण जंगम मालमत्तेचे मूल्य तीन कोटी ४१ लाख ११ हजार रुपये आहे. दिलीप माने यांनी जमीन-जुमल्याच्या माध्यमातून १५ कोटी एक लाख ६१ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. पत्नी जयश्री यांनी ६ कोटी ६६ लाख ८३ रुपये तर मुलगा पृथ्वीराज यांच्या नावावरील गुंतवणुकीचे मूल्य ५ कोटी २७ लाख ३१ हजार रुपये आहेत. तिघांच्या नावावरील एकूण स्थावर मालमत्तेचे मूल्य २६ कोटी ९५ लाख ७५ हजार रुपये आहे.