शिवरायांचा वापर केवळ निवडणुकीसाठी, पूनम महाजन यांचा भाजपला घरचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:25 AM2018-03-12T11:25:25+5:302018-03-12T11:25:25+5:30
पंढरपूर येथे पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमीच्या वतीने खासदार पूनम महाजन यांना युवक क्रांतिवीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
पंढरपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हात, कमळ, घड्याळ सगळेच मते मागतात. मात्र छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची व्याख्या आपल्या विचारानुसार मांडतात नव्हे फेकतात. त्यामध्ये घड्याळ, हात आणि कमळाचाही समावेश आहे, असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन यांनी केले.
पंढरपूर येथे पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमीच्या वतीने खासदार पूनम महाजन यांना युवक क्रांतिवीर पुरस्कार देऊन आज गौरविण्यात आले, या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉ. शेखर चरेगावकर, नगराध्यक्षा साधना भोसले, लक्ष्मीकांत पारनेरकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाजन म्हणाल्या, राजकारणात आपल्या प्रत्येकाला त्रास होतो. तसा त्रास महाजनांना देखील होतो. आपल्या नावापुढे कितीही मोठे आडनाव असले तरी संघर्ष अटळ आहे. काही लोक निवडणुकीपुरते गळ्यात जानवे घालतात मात्र मी खरी जानवेधारी शिवभक्त आहे असे सांगत त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींवरदेखील टीका केली.
देशाचे संविधान घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. प्रत्येकाला भारतीयत्वाची विचारधारा असावी. आपले हक्क, अधिकार पूर्ण करीत आपल्या देशाचे रक्षण करुया असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. आपल्या मायमातीचे संरक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे पूनम महाजन यांनी सांगितले. शिवरायांचा राजकारणासाठी वापर करण्यात भाजपाही मागे नसल्याचे महाजन यांनी सांगितल्याने ‘छत्रपती का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ’ या घोषवाक्यालाच एक प्रकारे घरचा आहेर दिल्याची चर्चा कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांमधून व्यक्त होत होती.
मनासारखा मतदारसंघ मिळाला नाही
च्२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी ज्या मतदारसंघात काम केले, तो मनासारखा मतदारसंघ मिळाला नाही. ज्या मतदारसंघात कोणी लढायला तयार नव्हते तिथे उमेदवारी मिळाली असल्याचे भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन यांनी सांगितले.