Shivsena: राज्यात 'डोंगार, झाडी' व्हायरल झाली की केली? तो कार्यकर्ता सांगतोय सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 02:34 PM2022-06-27T14:34:25+5:302022-06-27T14:35:32+5:30
रफिक नदाफ म्हणतात.. ऑडिओ क्लिप व्हायरल होण्यामागे माझा संबंध नाही
सोलापूर/सांगोला : त्या ऑडिओ क्लिप व्हायरल होण्यामागे माझा काही संबंध नाही, रेकॉर्डिंग कसे झाले, कोठून व्हायरल झाले याबाबत मला अद्यापही कळाले नाही. मीही सोशल मीडियावर सर्वत्र याच ऑडिओ क्लिपची चर्चा ऐकतोय. एक मात्र नक्की एवढ्या सगळ्या आमदाराने एकत्र भूमिका घेऊन मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचे ठरवले त्याला निश्चितच यश मिळेल असे आमदार शहाजीबापू पाटील यांचे मित्र रफिक नदाफ यांनी सांगितले. त्यामुळे आता क्लिप व्हायरल कोण केली, याची जोरदार चर्चा राजकारणात रंगली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एकमेव सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. मागील चार दिवसांपासून शहाजीबापूंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलेल्या ऑडिओ क्लिपची चर्चा राज्यभर रंगली आहे. दरम्यान, या क्लिपविषयी त्यांचे मित्र रफिक नदाफ यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, विधान परिषद मतदानानंतर त्यांचा संपर्क झाला नाही व त्यांच्या फोनही स्वीच ऑफ लागला. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांनी स्वतः फोन करून माझ्याशी गुवाहाटीमधील निसर्गरम्य वातावरणाविषयी हसतमुख चर्चा केली. त्यांच्या बोलीभाषेत त्यांनी काय डोंगार, काय झाडी, काय हाटील सगळं ओकेमध्ये असल्याचे हसून बोलले होते. त्यामुळे या क्लिपबाबत मलाही अनेकांचे फोन आले. विचारणा झाली वास्तविक माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग होत नाही, तिकडून रेकॉर्डिंग कसे झाले व कोठून व्हायरल झाले याबाबत मला अद्याप कळाले नाही; मात्र बोलताना त्यांच्यावर कोणताही दबाव वाटत नव्हता ते एकदम निवांत मजेत बोलल्याचे जाणवले. शिंदे यांनी मला सांगितले होते. कोणाला काही सांगायचे नाही. त्यामुळे मी त्यांच्यासोबत असूनही मलाही कळू दिले नाही, त्यांचे अत्यंत गुप्तपणे ठरले असावे, परंतु त्यांना जबरदस्तीने नेले किंवा बळजबरीने नेलं असं काही त्यांच्या बोलण्यातून जाणवले नाही. नेहमीप्रमाणे व्यवस्थित हसून बोलले, मात्र अडीच वर्षांतील त्यांनी मांडलेल्या व्यथा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसकडून अपेक्षित निधी मिळाला नसल्याची त्यांची खंत होती, असेही प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी सांगितले.
रफिक नदाफ १९९४ पासून शहाजीबापूंसोबत
रफिक नदाफ हे त्यांच्या वयाच्या २० व्या वर्षांपासून म्हणजे १९९४ पासून आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासोबत आहेत. त्यांनी सांगोला नगर परिषदेचे सलग तीनवेळा नगरसेवक व अडीच वर्षे नगराध्यक्ष पद भूषविले तसेच सलग ८ वर्षे तालुका काँग्रेस (आय) कमिटीचे तालुकाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. त्यांचे राष्ट्रवादी व काँग्रेस (आय) मित्रपक्षांशी सलोख्याचे संबंध आहेत. ते सध्या जिल्हा नियोजन समितीमध्ये निमंत्रित सदस्य आहेत.