पाकिस्तानप्रमाणे शिवसेना फसवी : नितेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 02:52 PM2019-02-23T14:52:53+5:302019-02-23T14:54:30+5:30
सोलापूर : अतिरेक्या कारवायांच्या बाबतीत पाकिस्तानने वारंवार फसविल्यामुळे जगात पाकिस्तानची विश्वासार्हता संपली आहे, हीच भावना आमची शिवसेनेबद्दल आहे, अशी ...
सोलापूर: अतिरेक्या कारवायांच्या बाबतीत पाकिस्तानने वारंवार फसविल्यामुळे जगात पाकिस्तानची विश्वासार्हता संपली आहे, हीच भावना आमची शिवसेनेबद्दल आहे, अशी टीका स्वाभिमानी पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी शनिवारी दुपारी सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली.
स्वाभिमानी पक्षाची बांधणी करण्यासाठी आमदार नितेश राणे शनिवारी दुपारी सोलापूर दौºयावर आले आहेत. आगमन झाल्यावर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप-शिवसेना युतीवर बोलताना राणे म्हणाले की, कोकणात शिवसेनेच्या नेत्यांनी खालच्या पातळीवर जाऊन भाजपवर टीका केली होती. अन आता युती झाल्यावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे भाजप नेत्यांबरोबर फोटोसेशन करण्यात मग्न आहेत.
पाच वर्षे सत्तेत असताना शिवसेनेने कोणते प्रश्न सोडविले असा सवाल त्यांनी केला़ धनगर आरक्षणाबद्दल का न्याय दिला नाही. आता राम मंदिरचा प्रश्न बाजूला सारून अतिरेकी कारवायाबाबत भूमिका पुढे करीत आहेत. याचाच अर्थ शिवसेनेची विश्वासार्हता संपली आहे. शिवसेनेने जनतेला मुर्ख समजू नये. आपण कोठेही गेले तरी ही जनता आपल्याबरोबर फरफटत येईल असे त्यांना वाटत असेल. पण हीच जनता त्यांना खड्यासारखे बाजूला काढल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीनंतरभाजपलाही याबाबत पश्चाताप होईल.
अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारने मराठा जनतेला फसविले आहे. आत्तापर्यंत एकाही तरुणाला बँकांनी कर्ज दिलेले नाही. त्यामुळे आता बँका फोडण्याची वेळ आली आहे. याबाबत आम्ही बँकेच्या अधिकाºयांना जाब विचारला तर सरकारने कर्ज देण्याबाबत आम्हाला बंधनकारक केले नाही अशी उत्तरे दिली जात आहेत. ही मराठा समाजाची फसवणूक आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समितीने मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण या सरकारने काढून घेतले. या प्रश्नावर स्वाभिमानी पक्ष आवाज उठविणार आहे असे नितेश राणे म्हणाले.
पाकिस्तानबद्दल खेळाडूंची भूमिका योग्य
पाकिस्तानला मैदानात खेळात हरविले पाहिजे असे माजी क्रिकेटपट्टू सचिन तेंडूलकर व सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलेले मत योग्य असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे. भारतीय खेळाडू निश्चितपणे पाकिस्तानी खेळाडूंचा पराभव करतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे त्यांचे पडलेले चेहरे पाहण्यासारखे असतील.