Shivsena: प्रति दादा कोंडके शिवसैनिकांच्या पंढरीकडे रवाना, सोलापूर ते मुंबई पायी वारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 04:08 PM2022-07-21T16:08:20+5:302022-07-21T16:21:28+5:30
Shivsena: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांची चांगलीच मैत्री होती.
सोलापूर/मुंबई - मराठी माणसाचा सर्वांगीण विकास अन प्रखर हिंदुत्व हे ब्रीद घेऊन हिंदुहृदयसम्राट स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना अखंड राहिली पाहिजे याच एका ध्येयाने एक शिवसैनिक आणि प्रती दादा कोंडके मातोश्रीवर निघाले आहेत. सोलापूर ते मुंबई पायी वारी करण्याचा संकल्प दक्षिण सोलापूरच्या उळे येथील प्रती दादा कोंडके उत्तम शिंदे यांनी केला आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून उत्तम शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झाले, ते 15 ते 20 दिवसांनी ते मुंबईतील दादर येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर पोहोचतील.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांची चांगलीच मैत्री होती. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून, शिवसेनेचे नेते म्हणून दादा कोंडकेंनी शिवसेनेसाठी जाहीर भाषणंही केली आहे. आपल्या भाषणात ते विरोधकांचा खरपूस समाचारही घेतं. त्यामुळेच, बाळासाहेबांनी ज्यांना प्रति दादा कोंडके संबोधले असे सोलापूरचे उत्तम शिंदे आता मुंबईला निघाले आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता माझी शिवसेना दुभंगते की काय अशी एक भावना सर्वसामान्य शिवसैनिकाची झाली आहे. परंतु, स्वर्गीय बाळासाहेबांनी महाकष्टाने उभारलेली हि शिवसेना अखंडच राहिली पाहिजे, ही राज्यातील शिवसैनिकच नाही तर प्रत्येक सामान्या माणसांचीसुध्दा लोकभावना आहे.
या लोकभावनेसाठीच स्वर्गीय बाळासाहेबांनी प्रति दादा कोंडके संबोधत ज्याला आशिर्वाद देत छातीला लावून घेतले, त्या उळे येथील उत्तम शिंदे यांनी पायी वारीसाठी पाऊल टाकले आहे. वारकरी जसे आपल्या मनातील भाव पंढरीनाथाच्या पायावर व्यक्त करण्यासाठी भगवी पताका खांद्यावर घेऊन विठूचा अन ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत पायी वारी करतो. तशीच ही सोलापूर ते मुंबई स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळापर्यंत पायी वारी असल्याचे उत्तम शिंदे यांनी सांगितले. स्वर्गीय बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ तमाम शिवसैनिकांसाठी प्रती पंढरपूरच आहे. या स्मृतीस्थळरुपी पंढरीत पोहोचल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीचे दर्शन घेऊन त्यांच्यासमोर तमाम शिवसैनिकांचा प्रतिनिधी म्हणून मी शिवसेनेच्या अखंडतेसाठी साकडं घालणार असल्याचे उत्तम शिंदे यांनी सांगितले.
दादा कोंडके यांनी जसे शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून काम केले तसेच काम त्यांच्यानंतर उत्तम शिंदे यांनी स्वर्गीय बाळासाहेबांच्या आशिर्वादाने केले. राज्यात विविध निवडणूकावेळी त्यांचं हे काम गेल्या 20 वर्षापासून अव्याहत सुरुच आहे. उत्तम शिंदे लहानपणापासूनच एक शिवसैनिक म्हणूनच काम करतात. सोलापूर ते मुंबई या वाटचालीत "एकला चलो रे" चा नारा घेऊन निघालेल्या या शिवसैनिकास गावोगावच्या शिवसैनिकांचे कसे पाठबळ मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. माझ्या शिवसेनेला ग्रहण लागलाय म्हणून पायी चालत निघालोय अशी प्रतिक्रिया यावेळी शिंदे यांनी दिली.