धक्कादायक; १५९ दिवसात १00२ जणांचा मृत्यू; ग्रामीण भागात कोरोना वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 04:55 PM2020-09-19T16:55:28+5:302020-09-19T16:57:04+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे़ बाधित रूग्णाबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे़ मागील १५९ दिवसात १ हजार २ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७ हजारांहून अधिक झाली आहे. यापैकी १ हजार २ जणांचा मृत्यू झाला असून, १९ हजार ८४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात १२ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण दगावला. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढत गेले व मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले. शहरानंतर बारा दिवसांनी ग्रामीण भागातील काही गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. एप्रिलमध्ये ग्रामीणमध्ये दोन पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू झाला. जून महिन्यात शहरासोबतच ग्रामीण भागातही रुग्ण वाढू लागले. मृत्यूमध्ये पुढे असलेले शहर सप्टेंबरमध्ये ग्रामीणच्या तुलनेत मागे पडले. ग्रामीणमध्ये मात्र दररोज ४00 हून अधिक रुग्ण आढळत आहेत. सप्टेंबर महिन्यात दररोज सरासरी दहा रुग्ण दगावल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, १२ एप्रिल रोजी शहरात पहिला कोरोनाचा बळी गेला. त्यानंतर मृत्यू वाढत गेले. ६ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात ५00 जणांचा मृत्यूचा आकडा होता. ११६ दिवसात इतके बळी गेले. लॉकडाऊननंतर ग्रामीणमध्ये मृत्यू वाढले. यानंतर अवघ्या ४३ दिवसात ५00 जणांचा बळी गेला आहे. अशाप्रकारे आत्तापर्यंत १५९ दिवसात कोरोनाचे १00२ बळी गेले आहेत.