धक्कादायक; मटकाप्रकरणातील २६० मटका बुकी, एजंटांनी सोलापूर सोडले...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 12:28 PM2020-09-05T12:28:09+5:302020-09-05T12:31:05+5:30
डायरीत आमचं नाव असल्यास वाचवा; वरिष्ठांकडे अनेकांची विनवणी
सोलापूर : मटकाप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या २८८ जणांपैकी अटकेत असलेल्या २८ जणांना जमीन मंजूर झाला आहे. मात्र यातील मुख्य सूत्रधार नगरसेवक सुनील कामाठी यांच्यासह २६० जणांचा शोध अद्याप सुरूच आहे. दरम्यान, कामाठीच्या डायरीतील टिपणांवरून पोलीस कर्मचारी आपल्या वरिष्ठांकडे त्या डायरीत आमचं नाव असल्यास वाचवा, अशी विनवणी करीत असल्याची माहिती सूत्रांकडून समजली.
न्यू पाच्छापेठ कोंचीकोरवी गल्लीत मटका बुकीवर पोलिसांनी धाड टाकली होती. त्यानंतर कामाठी यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये काही कागदपत्रे, हिशोबाच्या वह्या आणि रोख रक्कम गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केली होती. या प्रकरणी प्रथमत: चाळीस, त्यानंतर एकूण दोनशे तर त्याच्या पुढील तपासामध्ये एकूण २८८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांना २८ जणांना अटक करण्यात यश आले होते. पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी दोन्ही बाबी झाल्यानंतर सर्वांच्या जामिनाचा अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. सी. शेख यांच्यासमोर ठेवला होता. अॅड मिलिंद थोबडे यांनी गुन्ह्यात लावलेले ४२० हे कलम लागू होत नाही. सर्व आरोपी हे स्थानिक आहेत. ते पळून जाणार नाहीत असा युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी सर्वांची प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या प्रकरणी आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. विनोद सूर्यवंशी, अॅड. राजकुमार म्हात्रे, अॅड. श्रीकांत पवार, अॅड. दिनेश भोपळे, अॅड. अमीर बागवान यांनी तर सरकारतर्फे अॅड. करवते मॅडम यांनी काम पाहिले.
कामाठीची नोंदवही बनली चर्चेचा विषय
सुनील कामाठीच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या नोंदवहीमध्ये कोणाला किती पैसे वाटप केले जातात, याची नोंद गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. बातमी ‘लोकमत’ मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झाली. ती पाहताच अनेक पोलीस वरिष्ठांना, वरिष्ठ अधिकारी त्यांच्या वरिष्ठांना, साहेब! आमचं नाव असेल तर आम्हाला वाचवा, अशी विनवणी करीत आहेत, अशीच आज दिवसभर आयुक्तालयात चर्चा होती.
२६० जणांनी सोडले घर...
मटकाप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या मटका बुकी, एजंट अशा एकूण २६० जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर या सर्व लोकांनी घर सोडून सोलापूरबाहेर पळ काढला आहे. काहींच्या घराला कुलूप लागले आहेत. नगरसेवक सुनील कामाठी यांच्याही घराला कुलूप लागल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून वारंवार गुन्हा दाखल झालेल्या मंडळींना अटक होण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र सर्व जण आता अटकपूर्व जामीन घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.