धक्कादायक ; सोलापुरच्या रिपन हॉलमधील २९ हजार पुस्तके बांधकाम खात्याने फेकली रद्दीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 03:54 PM2018-12-20T15:54:41+5:302018-12-20T15:57:30+5:30
महापालिकेने घेतला ताबा: कोेटणीस स्मारकामध्ये करणार ग्रंथालय
राजकुमार सारोळे
सोलापूर : पासपोर्ट कार्यालय करताना सार्वजनिक बांधकाम खात्याने रिपन हॉलमधील दुर्मिळ २९ हजार पुस्तके रद्दीत फेकली होती, एका डॉक्टरने हा प्रकार उघडकीला आणल्यानंतर महापालिकेने या पुस्तकांचा ताबा घेतला आहे.
महापालिकेच्या हेरिटेज रिपन हॉलमध्ये जुन्या ऐतिहासिक पुस्तकांचा संग्रहालय होता, पण ही इमारत वापराविना पडून होती. सोलापूर पासपोर्ट कार्यालय सुरू करताना या इमारतीचा प्रस्ताव महापालिकेकडे आला. महापालिकेने हा प्रस्ताव सभागृहात मंजूर केला. या इमारतीच्या वापरापोटी महापालिकेला चांगले भाडे मिळाले. पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठी ही इमारत ताब्यात देण्यात आली.
इमारतीत पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठी नूतनीकरण करण्यात आले. बांधकाम खात्याकडे हे काम देण्यात आले होते. बांधकाम खात्याने इमारतीचे नूतनीकरण करताना या इमारतीतील दुर्मिळ वस्तू जतन करण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात देण्याऐवजी स्वत:च विल्हेवाट लावली. रिपन हॉलमध्ये असलेली दुर्मिळ पुस्तके उचलून चक्क बांधकाम खात्याच्या भंगारात टाकली. दोन वर्षात हा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही.
डॉ. सतीश वळसंगकर यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी याबाबत आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे विचारणला केली. त्यावर आयुक्तांनी बांधकाम खात्याकडे पुस्तकांबाबत विचारले. बांधकाम खात्याने एका खोलीत टाकलेली पुस्तके आयुक्तांनी पाहिली. डॉ. वळसंगकर यांनी त्या पुस्तकांचे महत्त्व आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. हा ऐतिहासिक ठेवा पाहून आयुक्त डॉ. ढाकणे चकित झाले. त्यांनी तातडीने ही पुस्तके भैय्या चौकातील डॉ. कोटणीस स्मारकामध्ये हलविण्याची सूचना केली. या ठिकाणी कपाट व रॅक उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या दुर्मिळ पुस्तकांचा ठेवा जपून ठेवला जाईल, असे आयुक्त डॉ. ढाकणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
औरंगजेबावरील पुस्तक
- याठिकाणी औरंगजेबावर लिहिलेले १९२६ चे पुस्तक आहे. पुस्तकाला कापडी आवरण आहे. डॉ. सतीश वळसंगकर म्हणाले, अशा अनेक दुर्मिळ पुस्तकांचा मी या अभ्यास करणार आहे. डॉ. कोटणीस स्मारकातील रिकाम्या कक्षात आयुक्त डॉ. ढाकणे यांनी या पुस्तकांचे ग्रंथालय उघडण्याचा संकल्प केला आहे. मी वैद्यकीय पदवी शिक्षण घेत असताना रिपन हॉलमध्ये टेनिस खेळण्यासाठी जात असे. त्यावेळी या गं्रथालयातील पुस्तके पाहिली होती. आता पासपोर्ट कार्यालय पाहून ही पुस्तके गेली कुठे, याबाबत आयुक्तांना विचारणा केल्यावर हा प्रकार समोर आला.
रिपन हॉलचा इतिहास
- इंग्रज काळात सोलापूर नगरपालिकेने ही इमारत बांधल्याचे माजी सहायक आयुक्त अनिल विपत यांनी सांगितले. नगरपालिकेने या इमारतीत जिमखाना, गं्रथालय व टेनिस कोर्ट सुरू केले होते. ग्रंथालयात अनेक जुनी पुस्तके होती. पार्क स्टेडियममध्ये जिमखाना सुरू झाल्यावर रिपन हॉल १९९२ मध्ये बंद करण्यात आले. तेव्हापासून ही दुर्मिळ पुस्तके धूळ खात पडून होती. २००६ मध्ये आयुक्त श्रीनिवासन व जिल्हाधिकारी दीपक कपूर असताना इतिहास संशोधक कै. भिडे व लता अकलूजकर यांच्या प्रयत्नातून या गं्रथालयाचे नूतनीकरण करण्याचा प्रयत्न झाला.
तीन जीपभर पुस्तके
- - आयुक्तांच्या सूचनेनुसार उपअभियंता प्रदीप जोशी यांनी बांधकाम विभागाला ७ डिसेंबर रोजी पुस्तके ताब्यात घेण्याबाबत पत्र दिले. त्यानुसार नगर अभियंता कार्यालयाकडील जीप घेऊन पुस्तके आणण्यासाठी गेले. २९०० पुस्तकांची यादी होती, पण जीप भरली तरी पुस्तके शिल्लक राहिली. त्यामुळे त्यांना तीन खेपा कराव्या लागल्या. २९०० नव्हे तर २९ हजार पुस्तके असावीत, असा अंदाज आहे.