धक्कादायक; सोलापुरातील ७० टक्के रिक्षाचालकांना ग्रासले पाठदुखी, मूळव्याधीनं !
By Appasaheb.patil | Published: September 2, 2022 02:40 PM2022-09-02T14:40:32+5:302022-09-02T14:40:39+5:30
आप्पासाहेब पाटील सोलापूर : सोलापूर शहर तसं स्मार्ट सिटी. मात्र वर्षानुवर्षं रस्त्यावर तेच तेच पडलेले खड्डे...वर्षानुवर्षं तोच तोच उघडलेला ...
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर शहर तसं स्मार्ट सिटी. मात्र वर्षानुवर्षं रस्त्यावर तेच तेच पडलेले खड्डे...वर्षानुवर्षं तोच तोच उघडलेला रस्ता...आठ ते बारा तास रिक्षा चालविताना बसणारे हदरे आणि सोबतीला धूर व प्रदूषणामुळे रिक्षाचालकांना ॲसिडिटीपासून पाठदुखी, मानदुखीचे विकार जडले असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. केवळ रिक्षाचालकच नव्हे, तर रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही ‘व्हिटॅमिन-डी’ची कमतरता, लठ्ठपणा, कंबरदुखीपासून हाडांच्या सांध्यांशी निगडित आजार जडण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
-------------
फुफ्फुसाचे आजार संभवण्याचा धोका
सोलापुरात धुळीचे प्रमाण सर्वाधिक आहे. शिवाय प्रदूषणाचेही प्रमाण जास्तच आहे. दररोज आठ ते दहा तास वाहतूक व प्रदूषणात वावरणाऱ्या रिक्षाचालकांना फुफ्फुसाचे आजार संभवण्याचा धोका असतो. सुमारे ७० टक्के रिक्षाचालकांना ॲसिडिटीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले.
--------------
तंबाखू, माव्याचे व्यसन...
बहुतांश रिक्षाचालकांमध्ये तंबाखूचे व्यसनही आढळून आले आहे. शिवाय सोलापुरात सर्वाधिक रिक्षाचालकांना माव्याचे व्यसन आहे. त्यात तरुण चालकांचा जास्त समावेश आहे. रस्त्यातील खड्डे व उखडलेले रस्ते, प्रदूषण अशा प्रतिकूल वातावरणात रिक्षाचालक काम करतात. त्यामुळे त्यांची आरोग्य तपासणी प्रत्येक सहा महिन्यांला करणे गरजेची आहे.
----------
सध्या नोकरी मिळत नसल्याने अनेक तरुण मुलं रिक्षा चालविण्याचे काम करतात. रिक्षाचालकांचे कामाचे तास निश्चित नसतात. त्यात विविध व्यसन असल्याने तरुणांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. रिक्षाचालकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- महिपती पवार, राष्ट्रवादी रिक्षा संघटना, सोलापूर
-------------
सातत्याने बसून रिक्षा चालविणे शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे अंगदुखी, पाठदुखी, मानदुखी सारखे आजार शरीराला जडतात. त्यात रिक्षाचालक अनेक आजार अंगावर काढतात. त्यामुळे जास्त झाल्यावर उपचार करण्यापेक्षा कमी असताना उपचार घेतल्यास लवकर बरे होता येते. व्यसनामुळे अनेकांचे आर्थिक व शारीरिक नुकसान होतंय हेही तितकेच खरे.
- डॉ. विठ्ठल धडके, वैद्यकीय तज्ज्ञ, सोलापूर