धक्कादायक; माण खोऱ्यातील ७१ लाखाच्या माडग्याळ मेंढ्याचा उपचार दरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 10:06 AM2021-04-30T10:06:57+5:302021-04-30T10:07:38+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सांगोला : माण खोऱ्यातील ज्या माडग्याळ मेंढ्याला ७१ लाखांची बोली आली होती, त्या सर्जा मेंढ्याचा उपचारादरम्यान गुरुवारी स.११:३० च्या सुमारास मृत्यू झाला. सर्जा च्या अचानक जाण्यामुळे मेटकरी कुटुंबिया समवेत सांगोला चांडोलेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
सांगोला चांडोलेवाडी येथील मेंढपाळ बाबुराव मेटकरी यांनी माडग्याळ जातीचा मेंढा पाळला होता.त्याचे नाव "सर्जा" ठेवले होते . त्याचे नाक राघूच्या चोचीसारखे असल्यामुळे त्याला मागणीही होती आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत होता . बाबुराव मेटकरी वर्षाकाठी मेंढ्याच्या व्यवसायातून सुमारे ५० लाखाचे उत्पन्न मिळवत होते. त्यांच्याकडे असणाऱ्या या सर्जा मेंढ्याला आटपाडीच्या बाजारात सुमारे ७१ लाख रुपयांना मागणी आल्याने " सर्जाने " चांगलाच भाव खाल्ला होता. कितीही किंमत आली तरी मेंढा विक्री करण्याचा बाबू मेटकरीचा विचार नव्हता. त्याच्यापासून जातिवंत पिल्ली, मादी व नर पैदास करण्यासाठी तो ठेवला होता.
गेल्या आठवड्यात त्यास निमोनियाची लागण झाल्याने त्याच्यावर कासेगाव ता. पंढरपूर येथे वैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी स.११:३० वाजता सर्जाचा मृत्यू झाला . त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना समजताच अश्रू अनावर झाले सर्जाला अगदी स्वतःच्या मुला प्रमाणे वाढवला होता तो कुटुंबातील एक प्रकारचा सदस्यच बंद होता त्यामुळे सर्जा नुसता सांगोल्यात नव्हे तर माण खोऱ्यासह कर्नाटका पर्यंत प्रसिद्ध होता. त्याच्यावर चांडोली वाडी येथे मेटकरी कुटुंबीयाने शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले.