धक्कादायक! १४ वर्षीय मुलाला दगड मारला अन् त्याचा जीव गेला; तीन अल्पवयीन मुले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:22 IST2025-04-23T15:22:30+5:302025-04-23T15:22:47+5:30
तीन अल्पवयीन युवकांना या प्रकरणात ताब्यात घेतले असून, त्यांना बालन्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

धक्कादायक! १४ वर्षीय मुलाला दगड मारला अन् त्याचा जीव गेला; तीन अल्पवयीन मुले ताब्यात
वैराग : बार्शी तालुक्यातील सर्जापूर येथे किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाची दगड मारून हत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबतीत तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम १०३(१), ११८(१), ११५ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. २१) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. इमरान अमर पाटील (१४) असे मयत मुलाचे नाव आहे.
याबाबत मयत मुलाचे वडील अमर पाटील (३८, रा. सर्जापूर) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी यांचे भाऊ शाहीर व अकबर पाटील यांचे गावालगत वडिलोपार्जित शेती व घर आहे. सोमवारी (दि. २१) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ शाहीर पाटील शेताकडे बाथरूमला जाताना त्यांना तीन अल्पवयीन मुले शेतात बसलेली दिसली. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर बॅटरीचा उजेड दाखवला असता त्या मुलांनी शाहीर पाटील यांना काठीने व दगडाने मारहाण केली. त्यांचा आवाज ऐकून इमरान हा त्याठिकाणी धावत आला. त्यावेळेस त्याला तिघांपैकी एकाने मुलाने दगड फेकून मारला. त्यामुळे इमरान हा रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर आडवा पडला. ही माहिती त्याची बहीण सानिया यांनी फिर्यादी यास सांगितले. माहिती मिळताच फिर्यादी व त्यांचे चुलत भाऊ अरबाज त्याठिकाणी गेले. त्यांनी इमरानला उचलून मोटारसायकलने वैराग येथील हॉस्पिटलमध्ये नेले.
इमरानला रक्तस्त्राव जास्त झाला असल्यामुळे डॉक्टरांनी त्यास बार्शी येथील दवाखान्यात घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर पाटील बंधूंनी इमरानला बार्शीतील हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी इमरान यास मृत घोषित केले. घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी यांनी वैराग पोलिस स्टेशनमध्ये तीन अल्पवयीन मुलांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. तीन अल्पवयीन युवकांना या प्रकरणात ताब्यात घेतले असून, त्यांना बालन्यायालयात हजर करणार असल्याचे सांगितले.