धक्कादायक! थांबलेल्या ट्रॅक्टरला ट्रकची जोरात धडक; चार ऊसतोड मजूरांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 11:53 AM2024-04-02T11:53:49+5:302024-04-02T11:54:05+5:30
मृत व जखमी मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी व चिखलगी गावातील ऊस तोडणी मजूर असल्याचे माहिती समोर आली आहे.
- अरूण लिगाडे
सांगोला : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने ऊस तोडणी कामगारांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीस पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ट्रॉलीमधील तीन महिलांसह चौघेजण जागीच ठार झाले तर इतर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कवठेमंकाळ व मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत व जखमी मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी व चिखलगी गावातील ऊस तोडणी मजूर असल्याचे माहिती समोर आली आहे. हा अपघात पहाटेच्या सुमारास नागपूर -रत्नागिरी महामार्गावरील नागज फाट्याजवळ घडला. मृतामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर ( ३० रा. शिरनांदगी ता मंगळवेढा), जगमा तम्मा हेगडे ( वय ३५), दादा आप्पा ऐवळे (वय १७), निलाबाई परशुराम ऐवळे (सर्वजण रा.चिखलगी ता मंगळवेढा) अशी मृत मजूरांची नावे आहेत.
कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी व चिखलगी गावातील काही ऊसतोड मजूर ऊस तोडणी साठी शिरोळ जि सांगली कारखानावर येथे गेले होते. ऊस तोडणीचा हंगाम संपल्यामुळे सोमवारी मृत व जख्मी शिरोळ येथून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून गावी परत निघाले होते. वाटेत मिरजपासून पुढे सांगोलाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत थांबलेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. धडकेत मंगळवेढा तालुक्यातील ऊसतोडणी मजुरासह चौघेजण जागीच ठार झाले तर इतर १० जण जखमी झाले आहेत.