Solapur | धक्कादायक! उड्डाणपुलावरून उडी मारलेल्या काळविटांच्या मृत्यूचा आकडा १४ वर
By Appasaheb.patil | Published: January 31, 2023 03:37 PM2023-01-31T15:37:43+5:302023-01-31T15:38:14+5:30
एकमेव शिल्लक काळवीट उपचारासाठी पुण्याला हलविणार
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : पुणे-विजापूर बायपास रोडवरील सोलापूरनजीक देशमुख पाटील वस्ती नजीक अपघातात तीन जखमी काळवीटा पैकी दुसऱ्या काळविटाचा सोमवारी मृत्यू झाला .शिल्लक राहिलेले एकमेव काळवीट उपचारासाठी पुण्याला हलविण्यात येणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी दीपक खलानी यांनी लोकमत शी बोलताना सांगितले .
सोलापूरच्या सिद्धेश्वर वनविहारातील रेस्क्यू सेंटर मध्ये चोवीस तास वैद्यकीय सेवा देण्याची सुविधा नसल्याने सध्या डॉक्टरांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. एकमेव जखमी काळविटांला वाचविण्यासाठी पुण्यातील बवधनच्या रेस्क्यू सेंटर ला हलविण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्याहून रेस्क्यू टीम सोलापूरात दाखल झाली असून ते सध्या गव्याच्या शोध घेण्यासाठी डोंणगाव, बेलाटी,देगाव,पाथरी परिसरात भटकंती करीत आहेत. ते लवकरच या जखमी काळवीटास पुण्याला घेऊन जाणार आहेत.
प्रवीणसिंह परदेशी यांनी केली घटनास्थळाची पाहणी
देशमुख पाटील वस्तीजवळील भुयारी पुलावर उड्या मारून ठार झालेली १२ काळवीटे आणि उपचारादरम्यान दगावलेली दोन काळवीटे या दुर्घटनेची गंभीर दखल घेत अपघात स्थळी संरक्षण जाळी बसविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे . अपघातस्थळाची महाराष्ट्र राज्य नीती आयोगाचे अध्यक्ष व वन्यजीव प्रेमी प्रवीणसिंह परदेशी हे सोलापूर भेटीत अपघातस्थळाची रविवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी संजय कदम, महेश येमुल, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील , नेचर काँझर्वेशन चे पप्पू जमादार, आदित्य घाडगे, प्रसाद बोलदे यांच्या समवेत पाहणी केली.
अपघात स्थळी तीन फुटांची जाळी बसविणार...
वनविभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला तत्परतेने जाळी बसविण्याची सूचना केली. अभ्यासगट स्थापन करून कायमचा तोडगा काढण्यात यावा असे त्यांनी सांगितले .वनविभागाकडून जाळी बसविण्याचे रेखांकन निश्चित करण्यात आले असून महामार्ग विभागाकडे सोपविण्यात आले. काळविटांच्या नेहमी ज्या ठिकाणाहून स्थलांतर करतात अश्या ठिकाणी तीन मीटर उंचीचे जाळ्या बसविण्यात येणार आहेत. लवकरच या कामाची सुरुवात होणार आहे अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा यांनी सांगितले.