धक्कादायक; वाईट संगतीतून दारूचे व्यसन जडते; नशा कुणाचे तरी आयुष्य संपवते !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 05:58 PM2021-10-27T17:58:32+5:302021-10-27T17:58:39+5:30
रक्ताचं नातंही संपवते : कोणाचातरी जीव जातो, अन्यथा गंभीर जखमी होतो
सोलापूर : दिवसेंदिवस तरुणाई दारूच्या आहारी जात आहे, त्यात वाईट संगत लागली की झालं. दारूच्या अशाच व्यसनातून रक्ताच्या नात्याला संपवल्याच्या अनेक घटना शहर व जिल्ह्यात घडल्या आहेत. दारूच्या नशेत कोणाचातरी जीव जातो, अन्यथा गंभीर दुखापत होऊन अपंगत्व येते. ग्रामीण भागात ११ तालुक्यात २५ पोलीस स्टेशन आहेत. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सात पोलीस ठाणे आहेत. दारू पिऊन झालेल्या भांडणांचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामध्ये रक्ताच्या नात्यातील भाऊ, बहीण, आई, वडील किंवा मुले यांचे प्राण गेले आहेत. दारूच्या नशेत चाकू, तलवार, धारदार शस्त्रे व बंदुकीने खून केल्याच्या घटना घडल्या आहेत. दारूच्या नशेत कोण कोणाचा खून करेल सांगता येत नाही. कारण किरकोळ असते, मात्र दारू पिल्यानंतर ते गंभीर स्वरूप धारण करते. झोपडपट्टी परिसर, सर्वसामान्य वर्गाबरोबर उच्चभ्रू लोकांमध्येही असे प्रकार घडले आहेत.
दारूच्या व्यसनातून आईला संपवले
- शेळगी परिसरात एक महिला मोलमजुरी करून मुलांना सांभाळत होती. दरम्यान, एका मुलाचा मृत्यू झाला. दुसरा मुलगा दारूच्या आहारी गेला होता. आईला दारूसाठी पैशाची मागणी केली तिने नकार दिला. शेवटी त्याला सहन झाले नाही, मध्यरात्री डोक्यात पार घालून खून केला.
बार्शीतही आईचा केला खून
- बार्शी शहरातही एक महिला आपल्या मुलाला घेऊन राहात होती. पती दुसऱ्या मुलाला घेऊन राहात होता. महिलेबरोबर असलेल्या मुलाला दारूचे व्यसन लागले होते. मुलाने आईला दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली; मात्र तिने त्याला नकार दिला. मुलाने आईच्या डोक्यात दगड घातला.
पत्नीचा केला खून
- घरची परिस्थिती बेताची. पत्नी काम करून मुला बाळांचा सांभाळ करीत होती, तर पती दारू पिऊन पडून रहात होता. घर सांभाळत असताना, काम न करणाऱ्या दारूड्या पतीने तिच्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. याच प्रकारातून त्याने पत्नीचा खून केला. स्वत: जेलमध्ये गेला, मुले रस्त्यावर आली.
म्हणून वाढतोय व्यभिचार
- दारूच्या नशेत माणूस काय करतो याचे त्याला भान रहात नाही. तो जागेवर नसतो, समोर कोण आहे हे पाहात नसतो. दारूच्या नशेत तो जे मनाला येईल तसे वागत असतो. समोरील व्यक्ती दारू प्राशन केल्यामुळे कोणी नाद करत नाही. याचा गैरफायदा घेत अनेक गैरकृत्य मद्यपीकडून होतात.
अल्कोहोल हा एक आजार आहे, तो माणसाच्या शरीरात गेला की त्याच्या मेंदूवरील नियंत्रण जाते. तो दारूच्या नशेत जे मनात येईल ते करतो, त्यामुळे याला आळा घालण्यासाठी संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधून त्यावर समुपदेशन करण्याची गरज आहे.
डॉ. कुंदन कांबळे, मानसोपचार तज्ज्ञ