धक्कादायक; मुलीकडचे घर पाहायला येण्यापूर्वीच भावी नवरदेवाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 11:30 AM2022-06-10T11:30:49+5:302022-06-10T11:30:56+5:30
मरवडे : बांधकामाला पाणी मारताना पाण्यात करंट
मंगळवेढा : अधिकारी होण्याची तीव्र इच्छा असणारा मरवडे (ता. मंगळवेढा) येथील सचिन तात्यासाहेब पवार (वय २८) हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. मात्र घराच्या बांधकामांवर पाणी मारत असताना विद्युत पंपाद्वारे पाण्यात उतरलेल्या करंटने त्याचा मृत्यू झाला. सचिनच्या लग्नाबाबत बोलणी सुरु होती. गुरुवारी दुपारी मुलीकडचे लोक घर पाहण्यासाठी येणार होते. तत्पुर्वीच ही दुर्दैवी घटना घडली.
मरवडे-चडचण रस्त्यालगत स्वतःच्या शेतामध्ये नव्याने सुरू असलेल्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी गुरुवारी (दि. ९) सकाळी आठच्या सुमारास धाकटा भाऊ इंजिनीअर संकेत यास सोबत घेऊन तो गेला होता. यावेळी पाण्याच्या दाबाने पाईप निघाल्याने तो जोडण्याचा प्रयत्न करीत असतानाच मोटार उंचावरून खाली पाण्यात पडली. शिवाय विजेची केबल पाण्यात पडल्याने घराच्या छतावर विजेचा करंट पसरला. विजेच्या जोरदार धक्क्याने त्याची होणारी अवस्था लक्षात येताच प्रसंगावधान राखून संकेतने विद्युत प्रवाह बंद केला. मात्र तोवर काळाने सचिनवर झडप घातली. त्यास उपचारासाठी पंढरपूर येथे दाखल केले. मात्र हा विजेचा धक्का इतका तीव्र होता की उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पार्थिवावर दुपारी अंतिम संस्कार करण्यात आले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता
सचिन हा शांत, संयमी व मनमिळावू म्हणून सर्वपरिचित होता. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. त्याचे अधिकारी होण्याचे स्वप्न होते. वडील तात्यासाहेब पवार हे हॉटेल चालवितात. धाकटा भाऊ संकेत हा बांधकाम व्यावसायिक आहे. मरवडे येथे बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय आहे. या दोन्ही व्यवसायांत सचिन हा अलीकडे वेळ देत होता.