धक्कादायक; लग्नपत्रिका वाटताना वधूपिता अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 10:37 AM2020-02-07T10:37:43+5:302020-02-07T10:39:40+5:30
वैराग-बार्शी रोडवरील घटना; मुलीच्या लग्नाला अवघे दोनच दिवस शिल्लक
वैराग / वाळूज : मुलीची लग्नपत्रिका वाटप करून येताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये वधूपिता जागीच ठार झाले तर चुलते जखमी झाले़ ही घटना गुरुवारी दुपारी वैराग-बार्शी मार्गावर घडली़ रामचंद्र अश्वमेध मोटे (वय ४५, रा़ वाळूज, ता़ मोहोळ) असे ठार झालेल्या वधुपित्याचे तर सुरतीसेन मोटे असे जखमी चुलत्याचे नाव आहे.
वाळूज येथील रामचंद्र अश्वमेध मोटे यांची मुलगी योगिता हिचे ९ फेब्रुवारी रोजी लग्न आहे. लग्नाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने त्यामुळे रामचंद्र मोटे व त्यांचे बंधू सुरतीसेन मोटे यांनी दिवसभर लग्नपत्रिका वाटल्या़ त्यानंतर वैराग येथे किरकोळ बाजार करून ते गावाकडे जात होते.
दरम्यान, त्यांची दुचाकी वैराग-बार्शी रोडवरील काळेगाव पाटी येथे आली असता समोरून आलेल्या दुचाकीशी समारोसमोर धडक झाली़ धडक इतक्या जोरात होती की, दोन्ही दुचाकींनी पेट घेतला. यामध्ये मुलीचे वडील ठार झाले व तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या ठिकाणी पत्रावळ्या, बाशिंग व इतर साहित्य पडलेले होते. या घटनेनंतर वाळूज गावावर शोककळा पसरली़ रामचंद्र मोटे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे़