धक्कादायक; शालेय पोषण आहारातल्या चवळीत निघाले भुंगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:59 PM2019-12-21T12:59:43+5:302019-12-21T13:01:51+5:30
निकृष्ट कसा द्यायचा: शिक्षक झाले त्रस्त, आहार नियोजनावर परिणाम
पंढरपूर : शालेय भोषण आहारात शासनाकडून देण्यात येत असलेल्या दाळी तसेच कडधान्यामध्ये चवळी ही निकृष्ट दर्जाची पुरवली जात असल्याचे समोर येत आहे. भुंगे लागलेले असल्याने ती खराब होत असून, वापरण्यायोग राहिलेली नाही. तालुक्यात थोड्याफार फरकाने ही स्थिती असल्याचे समोर येत आहे.
शासनाकडून कोणताही मुलगा कुपोषित राहू नये, शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पट वाढावा यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरू केली आहे. या योजनेचा सर्व मुलांना फायदा होत आहे. पोषण आहारात चवळी, मसूर, तूर यासह भाताचा समावेश आहे. मे महिन्यापासून मटकी डाळ बंद करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यात गत महिन्यापासून पुरवठा करण्यात येत असलेली चवळी ही निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर येत आहे. पुरवठा करण्यात आलेल्या चवळीत भुंगे आढळून आले आहेत. त्यामुळे चवळी खराब होऊन आहारात वापरण्यायोग्य राहिलेली नाही.
आठवड्यातून तीन दिवस चवळीचा आहार देण्याची सूचना देण्यात येत असताना, प्रत्यक्षात चवळी खराब झालेली आहे. यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. चवळी ऐवजी इतर दाळींचा वापर हा पोषण आहारात करावा लागत आहे.
शासनाकडून आलेले पोषण आहार धान्य हे सुस्थितीत राहावे यासाठी प्रत्येक शाळेकडून सोय केली जात आहे. दोन महिन्यात एकदा धान्याचा पुरवठा केला जातो. गत महिन्यात पुरवठा करण्यात आलेल्या धान्यामध्ये चवळी वगळता इतर धान्य चांगल्या दर्जाचे आहे. चवळीत ही निकृष्ट असल्याने त्यामध्ये भुंगे लागल्याचे समोर येत आहे.
तत्काळ कारवाई
- शिक्षण विस्तार अधिकाºयांमार्फत पोषण आहारात देण्यात येणाºया चवळी तसेच इतर धान्याची तपासणी करण्यात येईल. चवळीमध्ये सर्वाधिक प्रोटिन्स असतात. पुरवठादाराकडून निकृष्ट दर्जाची चवळी देण्यात येत असल्यास त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली.
गत महिन्यात पुरवठा करण्यात आलेल्या चवळीत भुंगे आढळून आले. ती आहारात वापरणे कठीण बनले आहे. धान्य ठेवण्याच्या ठिकाणी स्वच्छता असतानाही असा प्रकार घडत आहे. यामुळे आहार नियोजनावर परिणाम होत आहे.
- आर. आर. भालेराव, मुख्याध्यापक,
जिल्हा परिषद शाळा, वाखरी