धक्कादायक : शेतीच्या वाटणीसाठी मुलाने केला बापाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:49 PM2018-07-09T12:49:44+5:302018-07-09T12:51:19+5:30
सांगोला : शेताची वाटणी का देत नाही म्हणून संतापलेल्या मुलानेच शिवीगाळ, धक्काबुक्की करीत जन्मदात्या बापाच्या डोक्यात दगड मारल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारहाणीची घटना महुद (ढाळेवाडी, ता. सांगोला) येथे घडली. त्यानंतर वडील नारायण हरिबा होनमाने (वय ६०) यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़
ढाळेवाडी येथील नाना हरिबा होनमाने हे गट नं. १३५९/१ मधील वस्तीवर असताना मुलगा भीमराव होनमाने याने त्याठिकाणी येऊन वडील नारायण होनमाने यांना शेताची वाटणी का देत नाही म्हणून भांडण करीत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली़ यावेळी त्याने फेकून मारलेला दगड वडिलांच्या डोक्यात लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. १७ जूनपासून ते ४ जुलैपर्यंत ते बेशुद्ध अवस्थेत होते. अखेर उपचारादरम्यान नारायण होनमाने यांचे निधन झाला. याबाबत अर्जुन नाना होनमाने याने फिर्याद दिली असून, भीमराव नाना होनमाने याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
अज्ञात कारणावरुन अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्याने नायलॉन दोरीने शेवग्याच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी पहाटे ४ च्या सुमारास लोटेवाडी रोडवरील गणेश स्टोन क्रशरच्या नजीक स्वत:च्या शेतातील विहिरीलगत घडली. रामेश्वर दिलीप लोहार (वय २४, रा. जाधववाडी, चिकमहुद, ता. सांगोला) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
मूळच्या लक्ष्मीनगर येथील लोहार कुटुंबीयांनी जाधववाडी येथे शेतजमीन घेतल्याने त्याचठिकाणी राहत होते. रामेश्वर लोहार हा अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. दरम्यान, त्यांच्या शेताशेजारी सरगर यांची मुले पाखरांना हटविण्यासाठी रविवारी सकाळी ६ च्या सुमारास शेतावर गेली असता त्यांना रामेश्वर लोहार याने शेवग्याच्या फांदीला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनीच ही घटना त्यांच्या नातेवाईकांना सांगितल्याने आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.