धक्कादायक; अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीचा आजोबासमोरच शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 05:56 PM2021-07-30T17:56:49+5:302021-07-30T17:56:49+5:30
उत्तर कसबा येथील दुर्दैवी प्रकार : फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंद
सोलापूर : गांधी रोडवरील उत्तर कसबा येथील रस्त्याच्या कडेला अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीचा विद्युत डीपीला हात लागल्याने आजोबासमाेरच मृत्यू झाला. हा दुर्दैवी प्रकार गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडला असून याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.
पूर्वा सागर अलकुंठे (वय ५ वर्ष) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. पूर्वा ही नेहमीप्रमाणे घरासमोर अंगणामध्ये खेळत होती. आजोबा दारातच बसले होते, त्यांची नजर मुलांवर होती. मात्र खेळत खेळत चिमुकली थोडी नजरेआड झाली आणि ती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या डीपीजवळ गेली. तिचा डीपीच्या लोखंडी दरवाजाला हात लागल्याने तिला विजेचा शॉक बसला आणि ती जमिनीवर पडली. आजूबाजूच्या मुलांनी ओरड केली, आजोबांनी नजर फिरवली तर नात जमिनीवर पडलेली दिसून आली. आजोबा धावत जवळ गेले, विजेचा शॉक बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ त्यांनी मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगितले. याची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे.
पित्याने फोडला हंबरडा
पूर्वा अकलुंठे हिचे वडील सागर हे मजुरीचे काम करतात. त्यांना सात वर्षाचा मुलगा प्रेम व मुलगी पूर्वा असे दोन अपत्य होती. पूर्वा ही पाच वर्षाची असल्याने ती लहान गटात शिकत होती. घटना घडली तेव्हा तिचे वडील कामावर होते. त्यांना फोन करून शासकीय रुग्णालयात येण्यास सांगण्यात आले. सागर हे शासकीय रुग्णालयात आले तेव्हा त्यांना पूर्वाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मुलीचा मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला.
स्मार्ट सिटीच्या कामामुळे गमवावा लागतोय जीव
० सध्या शहरात सर्वत्र स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाळीवेस पर्यंतचा रस्ता खोदण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला वीज पुरवठा करण्यासाठी डीपी बसवण्यात आले आहेत. डीपी उघडा असून तो धोकादायक स्थितीमध्ये आहे. डीपी बसवण्यापूर्वी सागर अलकुंठे यांनी विरोध केला होता, मात्र तेव्हा त्यांना एमईसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. स्मार्ट सिटीचे काम करत असताना प्रशासनाचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे. लोकांना जीव गमवावा लागतोय.
संबंधितांवर गुन्हा दाखल करा : अमोल शिंदे
० स्मार्ट सिटीचे काम सुरू असताना प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटी सोलापूरच्या जनतेसाठी तयार केली जात आहे. या कामात लोकांचा लहान मुलांचा जीव जात असेल तर ही खूप गंभीर बाब आहे. या पूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. या प्रकाराला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.