धक्कादायक; कंटेनरच्या धडकेत महाविद्यालयीन तरूणीचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 10:41 AM2022-05-06T10:41:27+5:302022-05-06T10:42:49+5:30

जुना पुणे नाका येथील घटना : चालकावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Shocking; College girl dies in container collision | धक्कादायक; कंटेनरच्या धडकेत महाविद्यालयीन तरूणीचा जागीच मृत्यू

धक्कादायक; कंटेनरच्या धडकेत महाविद्यालयीन तरूणीचा जागीच मृत्यू

googlenewsNext

सोलापूर : बाळे येथील राहत्या घरी जात असताना पाठीमागून आलेल्या कंटेनरने दिलेल्या धडकेत पाठीमागच्या चाकाखाली सापडून महाविद्यालयीन तरुणी जागीच ठार झाली. हा अपघात गुरुवारी सायंकाळी ६.१० वाजता घडला. या प्रकरणी चालकाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वैष्णवी संतोष सरवदे (वय २१, रा. नामदेव नगर, अंबिका नगर, बाळे सोलापूर) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. वैष्णवी सरवदे ही संगमेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेत होती. सकाळी ११ वाजता ती नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती. दिवसभराचे तास झाल्यानंतर कॉलेज सायंकाळी ५ वाजता सुटले. ती घरी जाण्यासाठी मोटारसायकल (क्र. एमएच १३ डीके ६१०९) वरून निघाली. छत्रपती संभाजी महाराज चौकातून ती सर्व्हिस रोडने बाळेच्या दिशेने जात होती. जुना पुणे नाक्याच्या पुढील नागोबा मंदिराजवळ आली असता, पाठीमागून आलेल्या कंटेनर (क्र. एमएच ४६ एआर ६१८८) ने धडक दिली, त्यात ती खाली पडली व पाठीमागच्या चाकाखाली सापडली. चाक अंगावरून गेल्याने ती जखमी होऊन जागीच ठार झाली.

अपघात झाल्यानंतर तत्काळ कंटेनर चालक गाडी जागेवर सोडून पळून गेला. अपघाताची माहिती समजताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, पोलीस उपनिरीक्षक सतीश भोईटे, हवालदार चेतन पवार आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका बोलावून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी कंटेनर चालक अजरोद्दीन म. नजरोद्दीन शेख (वय २८, रा. मन्नाई, ता. चिडगुप्पा, जि. बीदर, राज्य कर्नाटक) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मैत्रिणींची भेट शेवटची ठरली

  • - वैष्णवी ही संगमेश्वर महाविद्यालयात बी. एस्सी.च्या तिसऱ्या वर्षात शिकत हाेती. ती वर्गात हुशार होती. कॉलेज सुटल्यानंतर ती आपल्या सर्व मैत्रिणींना उद्या पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन घरी निघाली होती; मात्र तिची ही भेट शेवटची ठरली.
  • - वैष्णवी हिला आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे. वडील एलएचपी कंपनीत कामाला आहेत, मोठा भाऊही कामाला आहे. आई-वडिलांनी मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. या प्रकारामुळे उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

Web Title: Shocking; College girl dies in container collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.