धक्कादायक; बाहेर पडणाऱ्या तरुणांसह ज्येष्ठ, लहानांमध्येही पसरतोय कोरोना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 05:02 PM2021-04-17T17:02:09+5:302021-04-17T17:03:10+5:30
घरातून कमी बाहेर पडणाऱ्यांनाही संसर्ग : जबाबदारीमुळे तरुणांना बाहेर पडणे गरजेचे
सोलापूर : शहर व जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून, शहरात रोज तीनशे ते चारशे, तर जिल्ह्यात रोज सातशे रुग्ण आढळून येत आहेत. रोज येणाऱ्या अहवालावरून सर्वाधिक बाधित हे तरुण असल्याचे दिसत आहे. बाहेर पडणाऱ्या तरुणांकडून तसेच स्वत: काळजी न घेतल्यानेही लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे.
आपल्या कामानिमित्त तसेच कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे तरुणांना घराबाहेर पडणे आवश्यक आहे. मात्र, घरी आल्यानंतर आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे त्यांच्याकडून लहान मुले व ज्येष्ठांना हा आजार होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी दहावी व बारावीच्या शाळा तसेच खासगी क्लासेसही सुरू झाले होेते. मैदानेही खुली करण्यात आली होती. या दरम्यान लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला असू शकतो.
ज्येष्ठ नागरिक हे घरीच असतात त्यांना त्यांच्या मुलांकडून आजार झाला असू शकतो. त्यासोबतच काही ज्येष्ठ हे सकाळी व सायंकाळी कट्ट्यावर येऊन गप्पा मारणे, पेन्शनसाठीची विचारणा करायला बँकेत जाणे आदींमुळेही ते कोविड पॉझिटिव्ह झालेले असू शकतात.
सोलापूर शहरामध्ये सुमारे २० हजार जणांना कोरोना झाला. त्यातील ० ते १५ वयोगटातील पॉझिटिव्ह हे १,४६३ तर साठ वयापेक्षा अधिकचे पॉझिटिव्ह हे ३९३५ इतके आहेत. त्यातील अनेकजण बरेही होऊन गेले.
बाहेरून घरी आल्यावर ही घ्या काळजी..
- बाहेरून घरी आल्यानंतर कपडे बाजूला ठेवून ते धुतले पाहिजेत. गरम पाण्याने अंघोळ करूनच घरामध्ये वावरले पाहिजे.
- - घरामधील ज्येष्ठ व मुलांजवळ जाणे टाळायला हवे. सर्दीसारखी लक्षणे असतील तर घरातही मास्क वापरायला हवा. मोबाइल सॅनिटायझ करावा.
- - ज्येष्ठ व मुलांसोबत गप्पा मारताना सुरक्षित अंतर ठेवावे, तरच आपण कोरोनाला रोखू शकू. ही काळजी रोजच घेणे गरजेचे आहे.
- ------
ही पहा उदाहरणे
- १. विजापूर रोड परिसरात एक ६१ वर्षांची महिला रहात आहे. रक्तदाब, मधुमेह असल्याकारणाने त्या घराबाहेर पडत नव्हत्या. तरीदेखील त्यांना कोरोना झाला असून, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
- २. जुनी मिल कंपाऊंड परिसरात एका नऊ वर्षाच्या मुलाला कोरोना झाला आहे. शाळा बंद असल्याने तो घरीच असतो. मित्रांसोबत फिरणे व खेळणेही त्याने बंद केले आहे. घराबाहेर न जाताही त्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे.
लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना घरातील तरुणांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मात्र, यासोबत इतरही कारणे आहेत. मागील काळात शाळा व मैदाने सुरू झाल्याने मुले बाहेर पडली होती तसेच काही ज्येष्ठ नागरिक हे काळजी न घेता बाहेर पडतात. यामुळेही त्यांना कोरोना झाला असू शकतो. सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. अभिजित जगताप, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ
-----
जिल्हा (शहर वगळून)
- १ ते १० वयोगटातील पॉझिटिव्ह – १९९७
- ११ ते २० वयोगटातील पॉझिटिव्ह - ४९६७
- साठ वयापेक्षा अधिकचे पॉझिटिव्ह – ९७११
- जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित – ५३,४३६