धक्कादायक; फोटोचा हार काढल्याने मुख्याध्यापकाने केली विद्यार्थ्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 01:19 PM2019-01-19T13:19:07+5:302019-01-19T13:21:11+5:30
मंगळवेढा : तालुक्यातील पाटखळ येथील शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर येथे जयंती साजरी झाल्यानंतर फोटोवरील जुना हार काढल्याच्या कारणावरून मुख्याध्यापक एस़ ...
मंगळवेढा : तालुक्यातील पाटखळ येथील शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर येथे जयंती साजरी झाल्यानंतर फोटोवरील जुना हार काढल्याच्या कारणावरून मुख्याध्यापक एस़ आऱ मोटे यांनी इयत्ता ९ वीतील दोन विद्यार्थ्यांना अंगावर व्रण उमटेपर्यंत पट्ट्याने बेदम मारहाण केली़ त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी येथील विद्यालयास कुलूप ठोकले व संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पाटखळ येथील शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात एस़ आऱ मोटे हे मुख्याध्यापक आहेत़ १२ रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी झाल्यानंतर फोटो शाळेत घेऊन जाताना त्या फोटोवरील हार खाली पडल्याने तो हार परत फोटोला घातल्याने मुख्याध्यापक संतप्त झाले़ परंतु त्यांनी त्यावेळी काही न करता बुधवारी प्रतीक विठ्ठल ताड व महेंद्र दत्तात्रय डांगे या दोन ९ वीतील विद्यार्थ्यांना कातडी पट्ट्याने बेदम मारहाण केली. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवर, हातावर व्रण उमटले आहेत़ त्यात कहर म्हणजे संबंधित मुख्याध्यापकाने त्या दोन विद्यार्थ्यांकडून हार पडल्याने माझी चूक झाली. पुन्हा अशी चूक करणार नाही, तसेच मारल्याबाबत घरच्यांनी विचारल्यास सायकलवरून पडलो आहे, असे सांगावयास सांगितले़ त्यामुळे भीतीपोटी विद्यार्थ्यांनी ही गोष्ट घरी सांगितली नाही.
१७ रोजी मुलाच्या अंगावर व्रण उमटल्याचे घरी लक्षात आल्याने सर्व प्रकार समोर आला़ १८ रोजी संबंधित पालकांसह गावातील पालकांनी शाळेत जाऊन जाब विचारत शाळेस कुलूप ठोकले़ शिवाय मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी केली़ त्यावेळी मुख्याध्यापकांनी माझी चूक झाली असून, मला माफ करण्याची विनंती केली, मुलांच्या उपचारासाठी मदत देतो, असे सांगितले़