धक्कादायक; उपचारासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा डॉक्टरने केला विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 12:25 PM2021-08-30T12:25:01+5:302021-08-30T12:25:36+5:30
आईने दिली फिर्याद : वळसंग पोलीस ठाण्यात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल
सोलापूर : उपचारासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी, डॉक्टरविरूद्ध वळसंग पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
डॉ. गोपाळ सुदर्शन आकेन (वय ४०) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. दि.२७ ऑगस्ट रोजी सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे ती रात्री ८ वाजता ‘बीएएमएस’ असलेल्या डॉ. गोपाळ आकेन याच्या दवाखान्यात उपचारासाठी गेली होती. तेव्हा डॉक्टरने तिला प्रथमत: नाव विचारून तू काय करतेस? असे विचारले. मुलीने नाव सांगितले तेव्हा त्याने तिला तुझे लग्न ठरले आहे का? अशी विचारणा केली, तेव्हा मुलीने हो माझे लग्न ठरलं आहे, असे सांगितले. डॉक्टरने तिला तू तेरे होने वाले मरद को छोड..., मेरे साथ चल, असे म्हणून आतील खोलीत नेले. आतील खोलीत नेऊन तिच्याशी अश्लील चाळे करीत विनयभंग केला. तेव्हा मुलीने आतून आरडाओरड केली. डॉक्टरला ढकलून ती बाहेर पळत आली. बाहेर बसलेल्या लोकांनी तिला विचारणा केली, मात्र ती रडत आपल्या घरी निघून गेली. घरी जाऊन आईला घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या आई व भावांनी येऊन डॉक्टरला जाब विचारला. तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. या प्रकरणी आईने वळसंग पाेलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३५४, बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (८) (१२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी
डॉ. गोपाळ आकेन याला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायाधीशांनी त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर रविवारी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक अजय हंचाटे करीत आहेत.